सुरगाणा – दोन दिवसांपासून संततधारेमुळे तालुक्यातील नार नदीला आलेल्या पुरात एक जण वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बाबत खोबळा (दिगर) येथील पोलिस पाटील रमण काशिनाथ गोबाले यांनी सांगितले की, तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील खिर्डी भाटीचा खिरपाडा येथील रामजू प्रधान कुवर वय वर्षे ६५ हा इसम पंधरा ऑगष्ट २०२१ रोजी गुजरात मधील धरमपुर येथील पाचवीरा येथे मुलीकडे पाहुणा म्हणून गेला होता. तिकडून परत आल्यानंतर खिरपाडा येथील पूर आलेल्या नार नदीचे पात्रात उतरत असतांना पाय घसरल्याने रामजू हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले. घरी परतण्यास उशीर झाल्याने नातेवाईकांनी दोन दिवसांपासून शोधाशोध सुरु केली होती. मात्र ते कोठेही आढळून आले नाही. अखेर त्यांचा मृतदेह १७ रोजी चार वाजेच्या दरम्यान नदी मधील लव्हाळीला अडकला असल्याचे नदीच्या काठावर खेकडी व मासे पकडण्यासाठी गेलेल्या आदिवासी बांधवांना दिसून आला. आकस्मित मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून याठिकाणी पूल बांधण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.