सुरगाणा – तालुक्यातील खुंटविहीर ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी येथील पंचायत समिती आवारात ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. खुंटविहिर ग्रामपंचायत अंतर्गत विविध मागण्यांसाठी तसेच या ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जावी यासाठी सुरगाणा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसलेल्या ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू ठेवले आहे.
खुंटविहीर ग्रुप ग्रामपंचायती मधील जुलै २०१६ ते २०२१ या कालावधीत सरपंच व ग्रामसेवक यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. ‘ड’ घरकुल आवास योजनेमध्येही सरपंच व ग्रामसेवक यांनी मोठा गोंधळ केला असून अनेक गरजु लोकांची नावे यादीतून वगळण्यात आली आहे. व जी नावे ऑनलाईन केली होती त्यातील २७१ नावे तपासणी वेळी वगळण्यात आली आहेत. चुकीच्या लाभार्थ्यांची नावे मंजूर यादीतून कमी करण्यात यावी. यासह इतर मागण्यासाठी खुुंटविहीर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कासम वळवी, पांडुरंग वाघमारे, रामा गावित, बाबूराव चौधरी, चंदर गावित, चंबार कामडी, यादींसह २० ते २५ नागरिक उपोषणास बसले आहे. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही व संबंधीतावर कार्यवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.