सुरगाणा – राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल थोरात, निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रथमच सात बालकांवर विविध प्रकारच्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याच शस्त्रक्रिया करण्यासाठी पालकांना नाशिक, दिंडोरी, गुजरात राज्यातील खारेल, वासदा, चिखली, बलसाड, सुरत, वापी येथे जावे लागत होते. या शस्त्रक्रियेमुळे गरीब आदिवासी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील पालकांना दिलासा मिळाला आहे. मोफत शस्त्रक्रिया करणेकामी नाशिक येथील निष्णात बालरोग तज्ञ सर्जन डॉ. बाबुलाल अग्रवाल यांच्या देखरेखीखाली बालरोग तज्ञ सर्जन डॉ. अमृता पोळ, डॉ. हर्षल माने, अधिपरिचारक सुमित बर्वे, भुलरोग तज्ञ डॉ. संजय चौधरी, डॉ. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पांडोले, डॉ. योगिता जोपळे, डॉ. प्रदीप पवार, डॉ. श्रीकांत कोल्हे, डॉ. माधुरी गावित, डॉ. दिपिका महाले, डॉ. सुनयना पवार, डॉ. भास्कर देशमुख, डॉ. कमलाकर जाधव, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक दिपक चौधरी,परिचारिका प्रज्ञा गोसावी, अनिता पोतदार, श्रीमती केळकर ,अधिपरिचारक हेमंत बागुल आदींनी शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीते करीता परिश्रम घेतले. यावेळी आदिवासी बचाव अभियानचे सामाजिक कार्यकर्ते रतन चौधरी, रामभाऊ थोरात, भगवान आहेर आदी उपस्थित होते.या शिबिरात हायड्रोसिल आजाराची तीन बालके, साईट इन्क्वाईनल हर्नीया तीन तसेच फायमोसिस आजाराचे एक बालक अशा सात बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये मानव वाघमारे वय ९ वर्षे जिल्हा परिषद शाळा करवंदे इ.३ री,जगदीश गांगुर्डे वय ९ वर्षं जिल्हा परिषद शाळा चुली उंबरठाण,राजेश म्हसे वय १० वर्षे जिल्हा परिषद शाळा रानपाडा मनखेड,अजय गावित वय ८ वर्षे जिल्हा परिषद शाळा बाफळून, ललित चौधरी वय ९ वर्षे जिल्हा परिषद शाळा हातरुंडी,सामील मेघा वय ४ वर्षे बालविकास प्रकल्प अंगणवाडी भवानदगड, आकाश चव्हाण वय वर्षे अडीच, बालविकास प्रकल्प अंगणवाडी मालग्वहाण या बालकांचा समावेश आहे. या शिबिराचे नागरिकांनी प्रशासनाचे स्वागत केले आहे.
शासन स्तरावरून चांगले प्रयत्न सुरु
अजून ही अतिदुर्गम आदिवासी भागातील जनतेमध्ये चुकीच्या गैरसमजुती मुळे लहान बालकांच्या विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यास पालक धजावत नाहीत. अंगणवाडी किंवा शाळा तपासणी दरम्यान अनेक बालके विविध किरकोळ आजारांची लक्षणे असलेली आढळतात. शस्त्रक्रिया केल्यास भविष्यात संतती होत नाही, शस्त्रक्रिया केल्यास त्या कुटुंबात व्यंग असलेली मुलं जन्माला येतात. शस्त्रक्रिया केली तर मुलं हमखास दगावण्याची भीती वाटते,मुलं मोठं झाल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया करु असे अनेक गैरसमज दुर करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांना पालकांची समजूत काढावी लागते. मी पण तुमच्यातीलच एक डाॅक्टर आहे.त्यामुळे माझ्या वर तरी भरोसा ठेवा अशी समजूत काढावी लागते. मुलं मोठं झाल्यावर शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही. मनातील हा गैरसमज संभ्रम दूर करून पालकांनी स्वतःपुढे आल्यास शासन स्तरावरून निश्चितच चांगले प्रयत्न सुरु आहेत. —
डॉ. योगिता जोपळे.
ग्रामीण रुग्णालय सुरगाणा.
मोठा हातभार लागला
माझा मुलगा ललित चौधरी हा तीन वर्षांचा असून अंगणवाडी आहे. त्याच्यावर यशस्वी पणे वैद्यकीय अधिकारी यांनी शस्त्रक्रिया केली आहे. माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची असून आम्ही दोघेही घर संसार चालविण्यासाठी मोलमजुरी निमित्ताने पिंपळगाव बसवंत भागात द्राक्षे बागेवर कामाला जात असतो. हि शस्त्रक्रिया करण्यासाठी मालकाकडून उसनवार फेडीचे कर्ज घेण्याचे नियोजन होते. ते हजारो रुपयांचे कर्ज काम करुन फेडण्यास दोन चार वर्षे मजूरी करावी लागली असती.मात्र महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत हे शिबिर आयोजित केल्याबद्दल आम्हाला खुप मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे खुपचं आभारी आहे.”
रेखा चौधरी,पालक
– हातरुंडी, ता. सुरगाणा.