सुरगाणा – तालुक्यातील वावरपाडा येथील कोरोना बाधित साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर साठ वर्षीय व्यक्तीने वावरपाडा जवळच असलेल्या बुबळी येथे किंवा सुरगाणा येथे स्वताची तपासणी न करता कोरोनाच्या भीतीपोटी येथून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसन येथील खासगी डॉक्टर कडे उपचारासाठी गेले होते. येथील डॉक्टरांनी तात्पुरते उपचार केले. मात्र तपासणी दरम्यान त्या वृद्धामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्यासाठी पाठवले. यावेळी त्यांची तपासणी केली असता ऑक्सीजन लेवल चाळीस ते बेचाळीस पर्यंत होती. तसेच रॅपीड अॅ॑टीजन टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आल्याने सदर व्यक्तीस तत्काळ रूग्णवाहीकेने सुरगाणा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. सुरगाणा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करून उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता त्यास मृत घोषित केले. पळसन ते सुरगाणा दरम्यान रस्त्यातच त्या वृद्धाचा मृत्यू झाला होता.
या वृद्धास कोरोनाची लागण होऊन आठ दिवस उलटले असावेत. केवळ कोरोनाच्या भीतीपोटी स्वताची तपासणी करून घेतली नाही. कायदेशीर सर्व सोपस्कार पार पाडून मृतदेह प्लास्टीकमध्ये निर्जंतुकीकरण करून थेट स्मशानभूमीत नेण्यात येऊन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटूंबातील काही जणांची तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आल्याचे समजते.
….