श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक : देशाच्या एकूण निर्यात उलाढालीत ६० टक्के वाटा असलेल्या जेएनपीटी(जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण) बंदराच्या तिप्पट क्षमता असलेले वाढवण बंदर २०२९ मध्ये सुरू होणार आहे. यामुळे भारतमाला योजनेची व्यवहार्यता संपली असून भारत सरकारने देशातील प्रमुख बंदर व औद्योगिक कॉरिडॉर यांना महामार्गाने जोडणारी भारतमाला परियोजना गुंडाळली आहे. याचा फटका सुरत चेन्नई या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे ला बसला आहे. यामुळे वाढवण बंदरामुळे सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे गुंडाळला गेल्याचे स्पष्ट झाले असून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी त्याला यश मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे.
देशातील जहाजांद्वारे परदेशात माल वाहतुकीच्या ६० टक्के वाहतूक एकट्या जवाहरलाल नेहरू बंदरावरून होत असते. सध्या हे बंदर पूर्ण क्षमतेने वापरले जात आहे. जवाहरलाल नेहरू बंदराची क्षमता पूर्ण वापरली जात असल्याने भविष्यात निर्यात वाढवण्यासाठी इतर बंदराच्या क्षमतांचा वापर करणे गरजेचे होते, यामुळे देशातील प्रमुख बंदरे एकमेकांना जोडणे व देशातील प्रमुख औद्यीगिक कॉरिडॉर व बंदरे एकमेकांना जोडणे यासाठी केंद्र सरकारने भारतमाला परियोजना जाहीर केली होती. या योजनेतून देशभरात बंदरे व औद्योगिक पट्टे एकमेकाना जोडून वेगाने व स्वस्त वाहतूक जाळे उभारण्यात आले. याच योजनेतून सुरत व चेन्नई या दोन बंदराना जोडणारा १६०० किलोमीटरचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे प्रस्तावित केला. या महामार्गामुळे दोन बंदरे तसेच अनेक औद्योगिक वसाहती एकमेकांना जोडल्या जाणार होत्या. दरम्यान महाराष्ट्र सरकारने पालघर जिल्ह्यात वाढवण येथे नवीन बंदर प्रस्तावित केले. त्याला पर्यावरण मान्यताही मिळवली.वाढवण बंदर हे जगातील प्रमुख मोठ्या दहा बंदरांपैकी एक असून जवाहरल नेहरू बंदराच्या तिप्पट क्षमतेचे आहे. यामुळे जवाहरलाल नेहरू बंदराची क्षमता संपल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर वाढवण बंदर हे उत्तर मिळाल्याने भारत सरकारने भारत माला परियोजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी देशातील पश्चिम, उत्तर, मध्य, दक्षिण रेल्वेमार्ग एकमेकांना जोडून ते वाढवण बंदराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आधीच एकमेकांना जोडलेले भारतमाला योजनेतील मार्ग वाढवण बंदराला जोडण्याचे नियोजन सुरू केले.
त्यासाठी मुंबई आग्रा महामार्ग व समृद्धी महामार्ग यांना जोडण्यासाठी वाढवण-इगतपुरी हा नवीन महामार्ग प्रस्तावित केला आहे. भारतमाला योजना गुंडाळल्याने सुरत चेन्नई मार्गाचे भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फटका महाराष्ट्रातील नाशिक, अहल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यातील मार्गाला प्रामुख्याने बसला. सोलापूर ते चेन्नई दरम्यान या महामार्गाचे काम सुरू असून नाशिक, नगर व सोलापूरमधील काम थांबले आहे. स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच याबाबत अधिकृतपणे माहिती देऊन या कामाला केंद्रिय मंत्रिमंडळाची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करीन, असे सांगायलाही दोन महिने उलटून गेले आहेत. वाढवण बंदरामुळे आता देशातील बंदरे एकमेकांना जोडण्याची गरज संपलेली असल्याने पेठ, सुरगाणा व गुजरातमधील जंगल जमीन वापरून त्यावर रस्ते उभारण्याची निकड उरलेली नसल्याने हा महामार्ग जवळपास रद्द झाल्यात जमा आहे.
…
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाचा पर्याय
सुरत चेन्नई महामार्गामुळे नाशिक-अहल्यानगर न सोलापूर यांच्या दरम्यान थेट महामार्ग होऊन त्यावरील औद्योगिक वसाहती एकमेकींना जोडल्या जाणार होत्या. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतही या मार्गाने जोडली जाणार होती. आता हा महामार्ग रद्द झाल्याने पुणे बाह्यवळण रस्ता ते रांजणगाव-नगर- शिर्डी, सिन्नर व ओझर असा नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग प्रस्तावित केला आहे. नाशिकवरून तो मार्ग थेट वाढवण बंदराला जोडला जाईल. यामुळे भारत माला योजनेचा उद्देशही साध्य होईल, या हेतूने महाराष्ट्र सरकारने तो महामार्ग प्रस्तावित केला असून भविष्यात तो केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडूनही केला जाऊ शकतो.
shaymugale74@gmail.com