नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातून जाणारा सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग हा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर जल अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण पाणी पुरवठा व जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी पाणी पुरवठ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज संसद रस्ता सुरक्षा समिती, सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग, ग्रामीण पाणी पुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाबाबत आयोजित आढावा बैठकीत डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, वासंती माळी, जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग पूर्ण झाल्यास वेळेची व इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच या महामार्गामुळे इतर राज्यासोबत जिल्ह्याची दळणवळण व्यवस्था वाढणार असून व्यापार वृद्ध होणार आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर बैठका घेण्यात याव्यात, असेही राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने होणे गरजेचे आहे. या महामार्गाचा एकूण १२२ किमी मार्ग नाशिक जिल्ह्यातून जात आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे. हा मोठा प्रकल्प आहे. लवकर काम सुरू होईल. शेतकऱ्यांना भूसंपादनच्या बदल्यात योग्य मोबदला मिळेल. इतर राज्याला जोडणारा हा चांगला प्रकल्प आहे .या प्रकल्पातून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. जागेचा मोबदला देण्याबाबत अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाणाक आहे. प्रत्येक जागेनुसार दर ठरवता ठरवला जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
जलजीवन मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागांमार्फत करण्यात येणारी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यात यावीत. तसेच ज्याठिकाणी ही कामे झाली आहेत तेथे त्या कामांच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत. तसेच रस्ता सुरक्षेबाबत मोठ्या शहरांमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येवून त्यानुसार आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच स्वयंसेवी संघटनांची मदत घेवून शाळा व महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.
Surat Chennai Highway Review Meeting Nashik