देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले भऊर येथील जवान अविनाश केवळ पवार यांचे पुणे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवार १० रोजी निधन झाले. देवळा येथील सुराणा पतसंस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. पतसंस्थेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष डॉ. रमणलाल सुराणा यांनी संचालक मंडळासह पवार कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले व ही मदत सुपूर्द केली.
केवळ बँकिंग सुविधा न देता आपण समाज्याचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने सुराणा पतसंस्थेने ‘शहीद सैनिक कुटुंब मदत निधी’ योजना गेल्या सहा वर्षापासून चालू केली आहे. या योजने अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ज्या वीर जवानास वीरमरण प्राप्त होते, देशासाठी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना संस्थेमार्फत रु.२५००० ची आर्थिक मदत दिली जाते. संस्थेने नफा वाटणीतून सदरचा निधी निर्माण केला आहे.
भऊर येथे मदतीचा धनादेश जवान अविनाश यांच्या वीरपत्नी तेजस्विनी पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अध्यक्ष डॉ. रमणलाल सुराणा, उपाध्यक्ष डॉ. जगदिश धामणे, संस्थापक उपाध्यक्ष अशोक सुराणा, संचालक प्रदिप सुराणा, ईश्वर सुराणा, संजय कानडे, डॉ. भूषण कर्नावट आदी उपस्थित होते.