मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाभा अणुसंशोधन केंद्राने (BARC) विकसित केलेल्या एचजीएसबीआर अर्थात “हायब्रीड ग्रॅन्युलर सिक्वेन्सिंग बॅच रिऍक्टर (hgSBR)” तंत्रज्ञानाचे (https://www.barc.gov.in/technologies/sbr/index.html) प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी, अणुऊर्जा विभागाचे घटक एकक असलेल्या अवजड जल मंडळाने स्नेह रश्मी बोटॅनिकल गार्डन, भेसन रोड, उगत, सुरत येथे मलजल प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारला आहे. दररोज 150 KL मलजल प्रक्रियेची या प्रकल्पाची क्षमता असून 01.08.2023 अस्तित्वात असलेले हे एसटीपी युनिट गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांची पूर्तता करत आहे आणि तंत्रज्ञानाचे यशस्वीरित्या प्रात्यक्षिक करत आहे.
अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मोहंती यांच्यासह भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन, अवजड जल मंडळाचे मुख्य कार्यकारी आणि अध्यक्ष एस. सत्यकुमार आणि अवजड जल मंडळाचे सहयोगी संचालक (परिचालन ) के.व्ही तळे यांनी सुरत महानगरपालिकेकडे एसटीपीचे हस्तांतरण केले. यावेळी कृभकोच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त शालिनी अगरवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रकल्प स्थळाला भेट देण्यात आली. अणुऊर्जा विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, अवजड जल मंडळ, सुरत महानगरपालिका आणि कृभकोचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अणुऊर्जा विभागाची संशोधन आणि विकास एकके सामाजिक लाभासाठी आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करत आहेत. या अंतर्गत भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केलेले एचजीएसबीआर तंत्रज्ञान घरगुती आणि औद्योगिक सांडपाण्यातील दूषित घटक प्रभावीपणे काढून टाकण्यासाठी ठोस जैविक उपचार पद्धती आहे, असे डॉ. मोहंती यांनी यावेळी सांगितले. या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याचा विभागाचा विचार त्यांनी व्यक्त केला.
भाभा अणुसंशोधन केंद्र विविध प्रकारचे अणुभट्टी तंत्रज्ञान, इंधन पुनर्प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापन, आयसोटोप अनुप्रयोग, प्रारण तंत्रज्ञान आणि आरोग्य, कृषी व पर्यावरणासाठी त्यांचा उपयोग यावर काम करत आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक विवेक भसीन यांनी दिली. एचजीएसबीआर तंत्रज्ञानाच्या लाभाची व्याप्ती अनेक लोकांपर्यंत पोहोचणारी आहे. हे तंत्रज्ञान वापरून मलजल प्रक्रिया प्रकल्प उभारणाऱ्या 20 हून अधिक खासगी संस्थांना भाभा अणुसंशोधन केंद्राने हे तंत्रज्ञान हस्तांतरित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
भाभा अणुसंशोधन केंद्राच्या जल आणि बाष्प रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. टी.व्ही. कृष्ण मोहन यांनी एचजीएसबीआरच्या तांत्रिक पैलूवर एक संक्षिप्त सादरीकरण केले आणि पारंपारिक तंत्रज्ञानापेक्षा या तंत्रज्ञानाच्या फायद्यांवर भर दिला.त्यांनी एसटीपीचा एक वर्षातला परिचालन कामगिरीचा डेटाही सादर केला. या तंत्रज्ञानामुळे इतर पद्धतींपेक्षा तुलनेने कमी खर्चात, कमी जागेत सांडपाणी आणि मलजल प्रक्रिया प्रकल्प बांधणे शक्य होते. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्राप्त संसाधने म्हणजेच प्रक्रियाकृत सांडपाणी आणि खत-पुरके, परिचालन खर्च काही प्रमाणात भरून काढू शकतात.
अवजड जल मंडळाचे मुख्य कार्यकारी आणि अध्यक्ष एस. सत्यकुमार यांचे बीजभाषण झाले. अणुऊर्जा विभागाचे औद्योगिक एकक म्हणून अवजड जल मंडळ भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाला अवजड जल आणि विषेश सामग्रीच्या उत्पादनाच्या माध्यमातून साहाय्य करते, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रउभारणीशी संबंधित क्रियाकलाप आणि सामाजिक लाभाशी संबंधित प्रकल्प यात मंडळ सक्रियपणे सहभागी आहे. जसे की ऑक्सिजन-18 पाणी, ड्युटेरेटेड कंपाऊंड, वैद्यकीय वापरासाठी ड्युटेरियम डिप्लेटेड वॉटर (DDW), हायड्रोजन, औद्योगिक भंगारातून कोबाल्ट, गॅलियम आणि इतर बऱ्याच बाबींचे उत्पादन. हा एचजीएसबीआर एसटीपी प्रकल्प सार्वजनिक वापरासाठी स्वदेशी विकसित तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक घडवण्यासाठी हाती घेण्यात आला होता. यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सुरत महानगरपालिकेचे आभार मानले. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपयोजित करण्यासाठी अवजड जल मंडळ उत्सुक आहे.
हे तंत्रज्ञान अधिकाधिक महानगरपालिका आणि खासगी संस्थांना आकर्षित करेल. अधिक चांगल्या प्रक्रियेसाठी, प्रक्रिया क्षमता वाढवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांमध्ये आवश्यक ते बदल करून हे तंत्रज्ञान वापरता येईल. निवासी सोसायट्या, रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मलजल प्रक्रिया प्रकल्प आरेखित करण्यासाठी याचा उपयोग करता येऊ शकतो.