इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणा-या सूरज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादीने युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद दिले आहे. त्यांच्यावर आधी केलेली कारवाई ही नावापुरतीच होती हे आता स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, नवाब मालिक, समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत सूरज चव्हाण यांना नियुक्तींचे पत्र देण्यात आले.
पावसाळी अधिवेशन सुरु असतांना विधानसभेत मोबाईलवर रमी खेळणारे तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलन झाली. लातूरमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संवादासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आले असता यावेळी छावा संघटनेने कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. त्यानंतर सूरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांची युवक प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. पण, अवघ्या काही दिवसातच त्यांना प्रमोशन देऊन पक्षाचे सरचिटणीसपद देण्यात आले.
हे पद दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की,
युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद? छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिले. आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
हेच का महाराष्ट्राचे ‘Good Governance?’ मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात? छान!
पण …… कमालीची बाब म्हणजे, अगदी दोन आठवड्या पूर्वी, मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात, ह्याच राष्ट्रवादी पक्षाने, सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यालय येत नाहीत असे कोर्टाला लिहून दिले आहे. (फोटो खाली जोडला आहे) मग असे अचानक काय झाले? काही महिन्यांपूर्वी ह्याच पक्षाने ‘जन सन्मान यात्रा‘ काढली होती. दिसला का ह्यांचा जन सन्मान?