सुरगाणा – सुरगाणा नगरपंचात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी अनपेक्षितपणे निकाल लागला असून बहमत नसलेल्या शिवसेनेचे भारत वाघमारे यांची उपनगराध्यक्ष पदी माकपच्या माधवी थोरात यांची निवड झाली आहे.
निवड प्रक्रियेच्या दोन दिवस आधीच नगरसेविका काशीबाई पवार यांच्या आकस्मित निधनाने एक मत कमी झाल्याने बहुमत असूनही भाजपाला समीप आलेले नगराध्यक्ष पद दुरावले आहे. हात वर करून मतदान घेतले असता दोन्ही बाजूला समसमान मते मिळाली. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या चिठ्ठी सोडत द्वारे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विजय कानडे व शिवसेनेचे भारत वाघमारे यांची नावे होती. इयत्ता तिसरीत असलेली भुमिका काळू ठाकरे हीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यात भारत वाघमारे यांचे नाव निघाले. तर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री शेजोळे व माकप कडून माधवी थोरात यांची नावे होती. तिसरीत असलेला हर्ष दिपक चौरे याच्या हातून चिठ्ठी काढली असता माकपच्या नगरसेविका माधवी थोरात यांचे नाव निघाले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी तहसिलदार सचिन मुळीक व नगरपंचात अधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भाजप ८, शिवसेना ६, माकप २, राष्ट्रवादी काँग्रेस १ असे बलाबल होते. ८ संख्या असलेल्या भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेविका जयश्री शेजोळे यांनी पाठिंबा दिला होता. तर ६ संख्या असलेल्या शिवसेनेला २ संख्या असलेल्या माकपच्या नगरसेविका माधवी थोरात व योगिता पवार यांनी पाठिंबा दिला होता. मात्र भाजपच्या नगरसेविका काशीबाई पवार यांचे दोन दिवस आधीच निधन झाले. यामुळे राजकीय गणित बदलले. हात वर करून मतदान घेतले असता शिवसेना ८ व भाजप ८ असे समान बलाबल झाल्याने चिठ्ठी सोडत द्वारे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे भारत वाघमारे यांची तर उपनगराध्यक्ष पदासाठी माकपच्या माधवी थोरात यांची निवड झाली. त्यामुळे दैवाने दिले पण कर्माने नेले असेच अनपेक्षितपणे निकाल जाहीर झाल्यानंतर घडले आहे.
विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावू
ईश्वरी चिठ्ठी सोडत द्वारे नाव निघाले ही केलेल्या कामांची पावती मिळाली आहे. पाच वर्षांमध्ये शिवसेनेने या शहरांमध्ये काम केले. अजून संपूर्ण शहराचा विकास करायचा आहे त्यासाठी देवाला पण काळजी होती की अशी माणसं त्या ठिकाणी बसली पाहिजे म्हणून मी सर्वप्रथम देवाचे आभार मानतो आणि आता सरकार असल्यामुळे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे सुरगाणा शहरातील ईतर कामांसह पाणीटंचाईचा प्रश्न आहे तो सोडवू. तसेच आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावू. —
भारत वाघमारे,नगराध्यक्ष.