सुरगाणा – सुरगाण्याच्या नवनिर्वाचित भाजपच्या नगरसेविका काशीबाई नागु पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी वापी ( गुजरात ) येथे सहलीला गेली असतांना ही घटना घडली. १५ फेब्रुवारी रोजी सुरगाणा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक आहे. या निवडणुकीत चांगलीच रस्सीखेच असल्यामुळे नगरसेवकांना सहलीसाठी घेऊन जाण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणूकीत येथील शामू पवार यांच्या मातोश्री ७० वर्षीय काशीबाई पवार या भाजपकडून प्रभाग क्रमांक १७ मधून निवडून आल्या होत्या. त्यांची सून अमृता पवार या देखील प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून आल्या आहेत. नगरसेविका काशीबाई यांनी त्यांच्या प्रभागासह सर्वच प्रभागातून पक्षाच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला होता. १५ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक असल्याने भाजपचे नगरसेवक व नगरसेविका सहलीवर गेले होते. काही नगरसेवक वापी येथे तर पवार परिवारातील सदस्य अजमेर येथे गेले होते. अजमेर येथे दर्शन घेऊन ते वापी येथे रात्री उशिरा पोहोचले होते. आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास स्नानगृहात आंघोळीसाठी गेलेल्या काशीबाई यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाने शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.
शहरात शोककळा
१५ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. भाजप ८, शिवसेना ६, माकप २ व राष्ट्रवादी काँग्रेस १ याप्रमाणे नगरसेवक असून नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विजय कानडे व शिवसेनेने कडून भारत वाघमारे यांनी नामांकन पत्र दाखल केले आहे. हे पद मिळविण्यासाठी दोन्ही कडून जोरदार प्रयत्न सुरू असताना प्रथमच निवडणूक लढवत विजय प्राप्त केलेल्या भाजपच्या नगरसेविका काशीबाई पवार यांचे निधन झाल्याची वार्ता आली आणि शहरात शोककळा पसरली. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, गुजरात मधील वासदा तालुकाध्यक्ष राकेशभाई शर्मा, एन.डी.गावित, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शोक व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली
नगरसेविका काशीबाई पवार यांना सर्वजण अम्मा म्हणत होते. त्यांचे शिक्षण झाले नसले तरी त्या हुशार होत्या. त्यांच्या कुटुंबीयांशी खूप वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. निवडून आल्यानंतर अजमेरला दर्शनासाठी जाण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्या निवडूनही आल्या. आणि अजमेर येथे गेल्या. अजमेर येथून त्यांचा मुलगा शाम, नगरसेविका सून अमृता यांचेसह वापी येथे काल रात्री मुक्कामी आल्या होत्या. सकाळी आंघोळीसाठी गेल्या असता काळाने घाला घालून काशीबाई यांना आमच्यातून हिरावून नेले. त्यांच्या आकस्मित निधनाने भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली आहे. —
हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार.