सुरगाणा – एकीकडे तालुक्यात ७३ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जोरदार तयारी सुरु असतांनाच प्रजासत्ताक दिनी सुर्योदय होण्यापूर्वी तालुक्यातील ३ युवकांकडे घातक शस्त्रे मिळून आल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटमाथ्यावरील चिराई तीन रस्त्या जवळील नागशेवडी शिवारात काही युवकांकडे घातक शस्त्रे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी व पथकातील त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहायक उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार गोरक्ष संवत्सकर, किशोर खराटे, प्रविण सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड आदींनी नागशेवडी शिवारात सापळा रचून चोख कामगिरी बजावत प्रजासत्ताक दिनी प भल्या पहाटे सुरगाण्यातील अंकेश सुरेश एखंडे (२९) रा. घोडांबे, शामराव नामदेव पवार (२४) रा.वांजुळपाडा व आकाश सुनिल भगरे (२२) रा.सुरगाणा या युवकांना ताब्यात घेत त्यांच्या कडून ३ बनावट पिस्तोल (गावठी कट्टे), ६ जिवंत काडतुसे, १ एयर गण, १ चॉपर, १ कोयता या घातक शस्रांसह ६ मोबाईल व १ टोयाटो कार हस्तगत केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून गुन्हेगारीचे लोन ग्रामीण भागात पसरू लागले असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे पोलीसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल अभिनंदन व्यक्त होत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून वरिष पोलिस पुढील तपास करीत आहेत.
काही गुन्हेगार सहभागी असण्याची शक्यता
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असून अवैध शस्त्रसाठा निर्मुलन हा त्या प्राथमिकतेचाच एक भाग आहे. या दिशेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची वाटचाल सुरू असतांना हि मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आणखीही काही गुन्हेगार सहभागी असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.
सचिन पाटील, पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण.