सुरगाणा – तालुक्यातील शिंदे दिगर येथे इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आश्रमशाळेत लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे दिगर येथे आदिवासी विद्यार्थ्यांकरीता एका खासगी संस्थेची निवासी आश्रमशाळा आहे. या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने पहाटे पाच वाजेच्या सुमारास आश्रमशाळेच्या भोजनालयाच्या ओट्यावर लोखंडीरॉडला नायलॉनची दोरी अडकवली व गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच कळवणचे विभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पराग गोतुर्णे, संतोष गवळी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करत आहे.