सुरगाणा – सुरगाणा तालुक्यात संध्याकाळी पाच वाजेपासून ढगांच्या गडगडाटासह जोरदारपणे अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने भाताच्या आवणात कापून ठेवलेला भात, खळ्यात रचून ठेवलेल्या भात, नागली,उडीद, वरई, खुरशनी हि पिके पावसात भिजून खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कोरोना काळात आर्थिक परिस्थितीने बेजार झालेला भात उत्पादक शेतकरी भात भिजल्याने चिंताग्रस्त झाला आहे. भात पावसात भिजल्याने गिरणीत भात भरडतांना तांदूळ चांगला सदट निघत नसल्याने भाव मिळत नाही. तर भात भिजल्याने चांगला भाव मिळत नाही. या दुहेरी संकटात भात उत्पादक शेतकरी सापडल्याने मेटाकुटीला आला आहे. राजाने मारले अन् पावसाने झोडपले तर दाद मागायची कोणाकडे अशी अवस्था झाली आहे. तीन ते चार दिवस पाऊस संततधार असला तर भाताच्या आंगरीलाच ( ओंब्यालाच) कोंब फुटून दाणे उगवणार अशी भयानक अवस्था भात उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपासून सुरु झालेला पावसाची संततधार रात्री नऊ वाजेनंतर ही सुरुच होती. अवकाळी पावसामुळे शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे.
पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी
तालुक्यात तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने रोजच जोरदारपणे हजेरी लावत भात शेतीचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात आता शेतातच ओब्यालाच कोंब फुटत आहेत. नुकसान झालेल्या भाताची कृषी विभाग, महसूल विभाग, तलाठी यांनी पाहणी करून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
चिंतामण गावित, आदिवासी सेवक.