सुरगाणा – तालुक्यातील मोहपाडा येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी आज ऑनलाईन पद्धतीने आदिवासी समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्याशी ‘आदिवासींचा जीवनप्रकाश’ या विषयावर लर्निंग बियॉ॑ड (Learning Beyond) आणि आदिवासी-जनजाती गौरव सप्ताह या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी पारंपारिक आदिवासी पावरी वादनाने त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालक शाळेतील शिक्षक नामदेव वाजे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शाळेची विद्यार्थिनी भाग्यश्री गायकवाड हिने डॉ. प्रकाश आमटे व मंदाताई आमटे यांचा परिचय करून दिला. यावेळी शाळेतील विद्यार्थी राणी बागुल, मनीषा बगळे, रुपाली पवार, ओमकार भोये आदि विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्याचा परिचय मुलाखतीच्या माध्यमातून करून घेतला. आमटे दाम्पत्यांनी अतिशय मनमोकळ्यापणे गप्पा करत विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय जीवन विकासासाठी पर्याय नसल्याचे ठळकपणे नमूद केले. यावेळी त्यांचे शिक्षण, त्यांना मिळालेली कार्याची प्रेरणा, कार्याची सुरुवात, कार्यात पत्नीची बहुमोल साथ, समाजातील कार्यकर्त्यांचा सहभाग , जीवनातील अविस्मरणीय प्रसंग अशा विविध मुद्द्यांवर सखोल असे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सर्व आदिवासी बांधवांचा विकास व्हावा, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या माणुसकीच्या भावनेतून हे समाजसेवेचे कार्य अविरतपणे तिसऱ्या पिढीनेही सुरू केल्याचे सांगितले. त्यांचा मुलगा व स्नुषा यांनीही आदिवासींच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी शाळा सुरू केल्या आहेत. या ऑनलाईन संवादात आदिवासी समाजाचा विकास हे मुख्य ध्येय असून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन अनेक स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते कार्य करत असल्याचे त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक संतोष गवळी, सुभाष दळवी, शिक्षक निलेश बुवा, दीपक अहिरे, नवनाथ ठाकरे आदींनीही संवाद साधला. डॉ.आमटे दाम्पत्यांशी संवाद साधताना आजचा दिवस हा शिक्षक व विद्यार्थी यांच्या जीवनातील व शाळेच्या इतिहासातील सुवर्णमयी, प्रेरणादायी असा अविसमरणीय दिवस असल्याची भावना शाळेचे मुख्याध्यापक संतोष गवळी यांनी मनोगतात व्यक्त केली. यावेळी शाळेतील पाचवी ते दहावी या वर्गातील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक संतोष जाधव, सुनील कासार,सतीश शेळके, मुकेश दोंदे, कैलास चौधरी,जयवंती जाधव, शैला हिरे, योगेश गोवर्धने, पावरी वादक भावराव पवार व सहकारी आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. प्रकाश आमटे यांचेशी ऑनलाईन संवाद साधताना मोहपाडा येथील मराठा विद्या प्रसारक मंडळ आश्रमशाळेतील विद्यार्थी.