सुरगाणा – येथील तेली गल्लीतील विद्युत खांबांवरील केबल जळून विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सातत्याने घडत असून याकडे लक्ष वेधूनही विद्युत अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तेली गल्लीतील खांबावर असलेली केबल जळून विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यात भरीस भर म्हणून वरील आदेशानुसार कोणत्याही वेळेस तासनतास भारनियमन केले जाऊ लागल्याने ऐन उन्हाळ्यात असा प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत विचारणा केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नसून नेहमीची पठडीतील उत्तरं दिली जातात. आधीच तासनतास भारनियमन आणि त्यातच केबल जळण्याचा प्रकार पुन्हा घडल्याने गेल्या २४ तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडला आहे. केबल जळून अर्ध्या शहराचा वीजपुरवठा बंद रहात असल्याने हा प्रकार घडू नये यासाठी चांगल्या प्रतीची नवीन केबल टाकण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. खंडित वीजपुरवठा मुळे वीजेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.
सुरगाणा शहरात कोणत्याही वेळेस भारनियमन सुरू करण्यात आल्याने वीजेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये देखील संताप व्यक्त केला जात आहे. ऐन होळीच्या यात्रेत जवळपास दोन ते तीन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्याने विशेषता शीत पेय व आईस्क्रीम विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून येथे अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा दिला जात असून मध्येच केंव्हाही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच भारनियमन सुरू करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पहाटे, सकाळी, दुपारी, संध्याकाळी वीजपुरवठा बंद केला जाऊ लागल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी आहे. भारनियमनाची वेळ निश्चित नसल्यामुळे वीज व्यावसायिकांचे व रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
मागील काही वर्षं सुरगाणा तालुक्याने सहा, आठ, बारा ते सोळा तासांचे भारनियमन सोसले आहे. त्यानंतरची किमान चार पाच वर्षे भारनियमन बंद होते. काही कारण असेल तरच वीजपुरवठा बंद रहात होता. मात्र आता सकाळी, दुपारी, संध्याकाळी, पहाटे असे केंव्हाही पुन्हा भारनियमन ऐन उन्हाळ्यात सुरू करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. भारनियमनाचे वेळापत्रक नसल्यामुळे कोणत्याही वेळेस वीजपुरवठा बंद केला जातो आहे. काही वेळेला सुरगाणा सबटेशन मधून तर अनेकदा थेट दिंडोरी येथून वीजपुरवठा बंद केला जाऊ लागला आहे. भारनियमन संदर्भात निश्चित वेळ नसल्याने तालुक्यातील नागरिक अद्यापही भारनियमन बाबत संभ्रमात आहेत. सध्या अपुऱ्या कोळसा व पाण्यामुळे वीज निर्मिती कमी होत असून त्यामुळे महाराष्ट्रातील इतर ठिकाणाप्रमाणेच सुरगाणा गाव व तालुक्यातील इतर गावात अधिकचे भारनियमन करावे लागत असून सदर भारनियमन बाबत १३२ दिंडोरी उपकेंद्र येथून SLDC कळवा यांचे आदेशनुसार केवळ चालू करा किंवा बंद करा एवढेच कळवले जाते व वेळेबाबत माहिती कळवली जाते. त्यामुळे सर्वांनी विजेचा काटकसरिने वापर करावा व भारनियमनास सहकार्य करावे अशी विनंती महावितरण कडून करण्यात आली आहे.