सुरगाणा – येथील होळी चौकात माजी आमदार जे.पी.गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येऊन क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसह विविध ठिकाणी कांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. संपूर्ण जगात विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात. त्याचप्रमाणे आजचा दिवस हा आदिवासी संस्कृती जपत आलेल्या जगातील आदिवासींचा जागतिक दिवस असल्याचे माजी आमदार जे.पी.गावित यांनी सांगितले. याप्रसंगी गावित यांनी वनजमिनींचा प्रश्न सोडविण्यात सुरगाणा तालुका आघाडीवर होता. वनजमिनींचा प्रश्न लावून धरला. त्यासाठी मुंबई, दिल्ली पर्यंत आपण गेलो. त्यामुळे काही कायदे झाले असले तरी अजून खूप काही मिळवायचे आहे. नोटबंदी, कोविड काळातील असुविधा, इंधन दरवाढ, ऑनलाईन शिक्षण, देशात सुरू असलेले खासगीकरण, गोरगरीब जनतेकडे होत असलेले दुर्लक्ष इत्यादी मुद्यांवर माजी आमदार जे.पी.गावित यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तालुक्यातील दूरवस्था झालेले रस्ते, घरकुल याद्या, आवास योजना आदींसह तालुक्यातील जनहितार्थ असलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती उपस्थित जनतेसमोर उघड करत उपस्थित बांधकाम अधिकारी यांचेसह इतर अधिका-यांकडे सवाल उपस्थित करून याबाबत आपण तहसिलदार यांचेकडे निवेदन सादर करणार असल्याचे यावेळी गावित यांनी सांगितले. याप्रसंगी उपसभापती इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, सावळीराम पवार, उत्तम कडू, भिका राठोड, धर्मेंद्र पगारिया, सुरेश गवळी, रामदास पवार, जनार्दन भोये, शिक्षक आदींसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.