जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एक देश एक निवडणूकचा नारा देणारे सरकार महाराष्ट्रातील निवडणूका पुढे ढकलत आहे याचा अर्थ सरकार डर रही है, कारण राज्यातील महायुतीचे नेते निष्क्रिय असल्यामुळेच प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्रात यावे लागत आहे आणि असे असेल तर तो महाविकास आघाडीचा विजय आहे असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. दोन पक्ष फोडण्याचे देवेंद्र फडवणीस यांना कौतुक वाटत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षातर्फे पारोळा येथे खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थित महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, सतिश अण्णांचे आणि पवार कुटुंबीयांचे अनेक दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा राजकीय नसून कौटुंबिक कार्यक्रम आहे. आपल्याला लवकरच विधानसभेचा गुलाल उधळायचा आहे.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी पक्षाकडे खासदरकीचे तिकीट सोडून काहीही मागत नव्हते कारण संसदेत पहिला नंबर येत असल्यामुळे मी मेरिटवर खासदारकीचे तिकिट मागितले, तर तो गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित केला. त्यांनी पक्ष फोडला, पण त्यांनी मागितले असते तर पक्ष चिन्हच काय सगळंच दिल असत आणि परत शून्यातून विश्व निर्माण केले असते, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
देशात एक अदृश्य शक्ती आहे, त्यांना हा देश स्वतःच्या मर्जीने चालवायचा आहे, पण हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने नाहीतर भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो, असे ठामपणे सांगितले.
आता अनेकजण माफी मागत आहेत, पण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा मनाने मोठा असतो पण माफी मागणारे स्वतःची चूक मान्य करत असतील ते कोर्टातील केस मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला. सध्या न्यायालयात सुरु असलेली लढाई ही फक्त पक्ष आणि चिन्हाची नाही तर ती नैतिकतेची लढाई आहे. कारण पक्ष आणि चिन्ह ओरबाडून घेणे हा पवार साहेब आणि उद्धवजींचा घात आहे, असे सांगितले.
मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण मी माझ्या ८० वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान आहे. कारण महिलांना सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा असतो. मी कष्टाची परिकाष्टा करेन आणि सत्याच्या मार्गाने चालेन पण कधीही दिल्ली समोर मुजरा करणार नाही, असे ठामपणे सांगितले. तसेच देशातील जनता खोकेवाली नाही, तर इमानदार आणि प्रामाणिक आहे, हे त्यांनी लोकसभा निकालात दाखवून दिले आहे. त्यामुळे आता पुढील ९० दिवस आपल्याला स्वाभिमानासाठी लढायचे आहे. आणि आपली सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हमीभावासंबंधीचा घेईल. असे आश्वासन दिले.
याप्रसंगी सतिश पाटील, रवींद्र पाटील, श्रीराम पाटील, रेखाताई, वर्षाताई, शांताराम पाटील, वर्षा शिंदे, पराग पवार, सुवर्णा पाटील, अन्नपुर्णा पाटील, कपिल चाैधरी, राजेंद्र डिसले, शेख बारीस, विद्या अहिरे, संतोष महाजन, जितेंद्र पाटील, कपिल पवार, स्वाती शिंदे, राजेंद्र रोकडे, सय्यद जाफरअली, कैलास राधेपाटील यांच्यासह महिला व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.