विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात ऑक्सिजनच्या पुरवठ्याची स्थिती अतिशय गंभीर असल्याने सर्वोच्च न्यायालयाने याबाबत शनिवारी मोठा निर्णय दिला. ऑक्सिजनबाबत यापूर्वी न्यायालयाने विविध निर्देश दिले. मात्र, त्याचा फरक पडत नसल्याने अखेर नॅशनल टास्क फोर्सची न्यायालयाने स्थापना केली आहे.
ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. देशातील विविध राज्यांना ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत समन्वय करण्यासाठी न्यायालयाने नॅशनल टास्क फोर्सच्या स्थापनेची घोषणा केली आहे. या फोर्समध्ये एकूण १२ सदस्य राहणार आहेत. त्यात वैद्यकीय, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या टास्क फोर्समध्ये डॉ. भबतोष विश्वास (कोलकाता येथील पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू), डॉ. देवेंद्र सिंह राणा (अध्यक्ष, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्ली), डॉ. देवी प्रसाद शेट्टी (चेअरपर्सन आणि कार्यकारी संचालक, नारायण हेल्थकेअर, बंगळुरू), डॉ. गगनदीप कांग (प्राध्यापक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू), डॉ. जे व्ही पीटर (संचालक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू), डॉ नरेश त्रेहान (व्यवस्थापकीय संचालक, मेदांता रुग्णालय व हृदय संस्था गुरुग्राम), डॉ. राहुल पंडित (संचालक, क्रिटिकल केअर मेडिसिन आणि आयसीयू, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड आणि कल्याण महाराष्ट्र), डॉ. सौमित्र रावत (अध्यक्ष आणि प्रमुख, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्ली), डॉ. शिवकुमार सरीन (वरिष्ठ प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, डायरेक्टर, इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्स (ILBS), दिल्ली), डॉ. झरीर एफ. उदवाडिया (कन्सल्टंट चेस्ट फिजीशियन, हिंदुजा हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल आणि पारशी जनरल हॉस्पिटल, मुंबई), आणि सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचा समावेश आहे.