नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक घटना म्हणजे पक्षस्थापना करणाऱ्या ठाकरे कुटुंबाच्या हातून पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही निघून जाणे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही देण्याचा निर्णय दिला. पण शिवसेनेचा निधी आणि सर्व शाखा सुद्धा शिंदे गटाला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
आशिष गिरी नावाच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. खरं तर ज्या पद्धतीने याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यावरून ते शिंदे गटासाठी लढत असल्याचं स्पष्ट जाणवत होते. मात्र, ही याचिका आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून दाखल केल्याचे आशिष गिरी या वकिलाने म्हटले होते. निकाल कुणाच्याही बाजुने लागला तरीही आपली हरकत नाही. निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर आहे तसेच कायम ठेवावे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर निधी त्यांच्याकडे सोपविण्यात यावा, असे वकिलाचे म्हणणे होते. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत आपली याचिका जोडावी आणि एकत्रित सुनावणी करावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली होती.
म्हणून याचिका फेटाळली
तुम्ही कोण आहेत याचिका करणारे, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, यासंदर्भात यापूर्वीच केस दाखल आहे. त्याचीही सुनावणी सुरू आहे. असे सांगत न्यायालयाने गिरी यांची याचिका फेटाळून लावली आहे.
शिवसेना भवनही द्यावे
मुंबईतील शिवसेना भवनदेखील शिंदे गटाला देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेले शिवसेना भवन म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा प्राण आहे.
मी शिंदे गटाचा नाही
मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली होती, असे आशिष गिरी यांनी म्हटले आहे. मी कायद्याच्या बाजूने आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर सर्व त्यांना देण्यात यावे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, तर त्यांना दिले जावे. मात्र, आता सर्व गोष्टींवर निर्बंध लावले जावे, असे गिरी यांचे म्हणणे होते.
निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर शिवसेना पक्षाची संपत्ती ठाकरेंऐवजी आता शिंदे गटाच्या ताब्यात द्या ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
आशिष गिरी नावाच्या वकिलाची याचिका होती
तुम्ही कोण ही याचिका करणारे, याबाबत केस चालू आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टाने फटकारले
— Prashant Kadam (@_prashantkadam) April 28, 2023
Supreme Court Relief Uddhav Thackeray Politics