नवी दिल्ली (इंडया दर्पण वृत्तसेवा) – बलात्कार प्रकरणात एका आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी आनंद साजरा केल्यामुळे सर्वोच्च न्यायालायने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बलात्कार प्रकरणातील एक आरोपी विद्यार्थी नेत्याला जामीन मिळाल्याचे स्वागत करताना ठिकठिकाणी फलके लावून आनंद साजरा करण्यात आला. त्या फलकांमध्ये ‘भय्या इज बॅक’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. या फलकांविरुद्ध तक्रार केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आरोपीच्या वकिलाला चांगलेच फटकारले आहे.
आरोपीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन पीडित महिलेवर पुन्हा-पुन्हा बलात्कार केला. तसेच एक गर्भपात करण्यासही भाग पाडले. यावर मध्य प्रदेशच्या महिलेने आरोपीच्या जामीन अर्जाला आव्हान देताना सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे या प्रकणाची सुनावणी सुरू आहे. खंडपीठातील न्यायाधीश हिमा कोहली यांनी विचारले, की “तेथे फलक लावला आहे आणि त्यावर ‘भय्या इज बॅक’, असे लिहिले आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीचे सेलिब्रेशन करत आहात?” सरन्यायाधीशही म्हणाले, की ‘भय्या इज बॅक’ हे काय आहे?” आरोपीच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, की “तुमच्या भय्याला या एका आठवड्यात सावध राहण्यास सांगा.”
आरोपी शुभांग गोंटिया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विद्यार्थी नेता आहे. आरोपीचा जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेत पीडित महिलेने बाहेर लावण्यात आलेल्या फलकांची माहिती दिली होती. त्यावर “तुमचा जामीन रद्द का करू नये,” असा सवाल करत न्यायालयाने शुभांग गोंटियाला नोटीस जारी केली आहे.
मध्य प्रदेश सरकारकडूनही सर्वोच्च न्यायालयाने उत्तर मागवले आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये आरोपी शुभांग गोंटिया याला जामीन दिला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तथ्य आणि गंभीरतेवर विचार केला नाही, असा दावा पीडित महिलेने याचिकेत केला आहे. आरोपीविरुद्ध जून २०२१ मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीवर ५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
आरोपीने एका खासगी कार्यक्रमादरम्यान महिलेच्या भांगेत कुंकू लावून गळ्यात मंगळसूत्र घातले होते. परंतु सार्वजनिकरित्या तिला स्वीकारण्यास नकार दिला होता. पीडित महिला गर्भवती असताना त्याने बळजबरीने गर्भपात केला होता. त्यानंतर महिलेने जबलपूर महिला पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपीने पलायन केले, असा आरोपही महिलेने केला आहे.