नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालाने दिले आहेत. तसेच, न्यायालयाने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे.
शिर्डी येथील ओझरमध्ये निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले होते. त्या कीर्तनात इंदुरीकर महाराज म्हणाले होेते की, पती-पत्नी यांनी सम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगा होतो तर विषम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगी होते. त्यांचे हे विधान वादग्रस्त ठरले. याप्रकरणी इंदुरीकर महाराज यांना जिल्हा शल्य चिकीत्सकांनी नोटिस बजावली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अॅड रंजना गवांदे यांनी इंदुरीकर महाराज यांच्या विरुद्ध खटला दाखल केला. इंदुरीकर महाराज हे अंधश्रद्धा पसरवित आहेत, असा आरोप त्यात करण्यात आला. या याचिकेची दखल घेत प्रथम वर्ग न्यायालयाने आदेश दिले की इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यानंतर संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने युक्तीवादानंतर हा खटला रद्द करत इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता.
सत्र न्यायालयाच्या विरोधात ॲड. रंजना गवांदे यांनी ॲड. जितेंद्र पाटील व ॲड. नेहा कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानेही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर महाराज यांची याचिका निकाली काढली. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे. परिणामी, त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
The Supreme Court rejected the petition of Indurikar Maharaj kirtankar superstition anis sc child birth statement