नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपचार करताना डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याने पतीचा मृत्यू झाला असा आरोप करणाऱ्या एका तक्रारीवर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दिले आहे. वैद्यकीय सेवेचे योग्य ज्ञान नसल्यामुळे, काल्पनिक गृहितकावर हॉस्पिटलमधील प्रत्येक मृत्युला वैद्यकीय निष्काळजीपणा जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. या निरिक्षण नोंदवत राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलेला आदेशदेखील न्यायालयाने कायम ठेवला आहे.
दिल्लीमध्ये एका मृत व्यक्तीच्या पत्नीने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. रुग्णाला उलट्या होत असल्याने तिने पतीला रुग्णालयात आणले होते. डॉक्टरांनी रुग्णाला एक इंजेक्शन दिले होते. त्यानंतर रुग्णाच्या अंगावर पेटके उठले आणि तो बेशुद्ध पडला. नंतर रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ७० टक्के ब्लॉकेज असल्याची माहिती देण्यात आली. ही माहिती समजल्यानंतर ह्रदयरोगतज्ज्ञांना बोलावण्याची विनंती रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. शिवाय, नातेवाईकांनाही अतिशय खराब वागणूक दिली. यानंतर मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास रुग्णाला मृत घोषित करण्यात आले.
मृत रुग्णाच्या पत्नीने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, त्यात ७ कोटी रुपये नुकसानभरपाई आणि मानसिक त्रासासाठी ३ कोटी रुपये मिळावे अशी मागणी तिने केली आहे. यावर निष्काळजीपणाचा कोणताही पुरावा नसल्याने डॉक्टरांच्या निर्णयावर आक्षेप घेणे चुकीचे ठरेल असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. पुरेसे वैद्यकीय ज्ञान नसताना, काल्पनिक गृहितकावर रुग्णालयाला किंवा डॉक्टरांना जबाबदार धरता येत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Supreme Court Order on Hospital Death