इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात हिंदू कुटुंबात वडिलांच्या वृद्धापकाळात किंवा मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता याची वाटणी होते. मात्र यावरून काही वेळा वाद देखील होतात. वडिलांची स्वआर्जित आणि वारसा हक्काने मिळालेली संपत्ती कोणाला द्यावी? याबाबत कुटुंबातच निर्णय होतो. फारफार तर अगदी जवळचे नातेवाईक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. परंतु काही वेळा वादातून कोर्टकचेऱ्या देखील होतात. पुर्वी बहुतांश वेळा यामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीत मुलीला वाटा मिळत नसे किंवा मुलगी वाटा मागत नसे. परंतु अलीकडे काही वेळा मुलगी देखील वडिलांच्या संपत्तीत वाटा मागू शकते, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
हिंदू मुलीच्या (महिलेच्या) मालमत्तेच्या उत्तराधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मृत्यूपत्राशिवाय मृत्यू झालेल्या हिंदू व्यक्तीच्या मुलीला वडिलांच्या स्व-अधिग्रहित आणि वारसाहक्काच्या मालमत्तेचा वारस मिळण्याचा अधिकार आहे. वडिलांच्या मालमत्ता वारसामध्ये इतर सहभागींपेक्षा (म्हणजे मुलाची मुलगी (नात ) आणि वडिलांचे भाऊ यांच्यापेक्षा) जास्त किंवा अधिक प्राधान्य मुलीला असेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मृत्युपत्राशिवाय मृत्यू झालेल्या निपुत्रिक हिंदू महिलेच्या मालमत्तेच्या उत्तराधिकारावर न्यायालयाने म्हटले आहे की, अशा महिलेची मालमत्ता त्याच मूळ स्त्रोताकडे परत जाईल. जिथून तिला मालमत्ता वारसा हक्काने मिळाली आहे. जर स्त्रीला आई-वडिलांकडून मालमत्ता वारसा हक्काने मिळाली असेल, तर ती मालमत्ता वडिलांच्या वारसांकडे जाईल आणि जर तिला पती किंवा सासऱ्याकडून मालमत्ता वारसा हक्काने मिळाली असेल, तर ती मालमत्ता पतीच्या वारसांकडे जाईल. पती किंवा मूल जिवंत असल्यास महिलेची मालमत्ता ही पती आणि मुलांकडे जाणार असली, तरी त्यात तिला पालकांकडून वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेचाही समावेश असेल.
हिंदू महिला आणि हिंदू विधवा यांच्या मालमत्तेच्या उत्तराधिकाराबाबत हा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांनी दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध दाखल केलेले अपील निकाली काढताना हा निर्णय देण्यात आला आहे. एकूण ५१ पानांच्या निकालात न्यायालयाने हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ लागू होण्यापूर्वी आणि परंपरागत कायद्यात हिंदू महिलेच्या मालमत्तेवरील अधिकारांवर चर्चा केली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, विधवा किंवा मुलीचा स्व-अधिग्रहित मालमत्तेवर किंवा हिंदू पुरुषाच्या वारसा हक्क केवळ जुन्या हिंदू प्रथा कायद्यातच नव्हे तर विविध निकालांमध्येही मान्य करण्यात आला आहे.
महिलांना संपत्तीत पूर्ण अधिकार आहेत, कारण सन 1956 चा हिंदू उत्तराधिकार कायदा आल्यानंतर महिलेला संपत्तीत पूर्ण अधिकार मिळाला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जर निपुत्रिक हिंदू स्त्री मृत्यूपत्राशिवाय मरण पावली तर तिची मालमत्ता त्याच स्त्रोताकडे परत येईल. जर तिला आई-वडिलांकडून मालमत्ता वारसा हक्काने मिळाली असेल तर ती वडिलांच्या वारसांकडे परत जाईल आणि जर पती किंवा सासरकडून वारसा मिळाला असेल तर ती पतीच्या वारसांकडे जाईल.
न्यायालयाने म्हटले आहे की, हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 च्या कलम 15(2) चे मूळ तत्व असे आहे की, मालमत्ता त्याच स्त्रोताकडे परत केली जावी. परंतु जर महिलेला पती किंवा मुले असतील तर संपत्ती पती आणि मुलांकडे जाईल.न्यायालयाने सांगितले की, सध्याचे प्रकरण सन 1967 चे आहे, त्यामुळे या प्रकरणात हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 च्या तरतुदी लागू होतील आणि मुलगी आहे. वडिलांच्या मालमत्तेचा वारसा हक्क आहे, म्हणून त्यातील एक पंचमांश मालमत्ता त्याच्याकडे जाईल. ही याचिका स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवला आहे.