नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविड काळात आई-वडील गमावलेल्या पाच वर्षांच्या मुलाच्या ताब्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आपल्या नातवंडांची काळजी घेताना आजी-आजोबा सर्वात उत्साही असतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने अहमदाबाद उच्च न्यायालयाचा निकाल बदलला आहे.
अहमदाबादमधील निवृत्त सरकारी कर्मचारी ७१ वर्षीय स्वामीनाथन कुंचू आचार्य यांनी गुजरात उच्च न्यायालयात नातवाच्या ताब्यासाठी याचिका दाखल केली आहे. मुलगा आणि सून यांच्या निधनानंतर त्यांचा नातू मामीकडे व आईच्या आई – वडिलांकडे जाऊन राहू लागला. याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, आतापर्यंत मूल आजी-आजोबांसोबत होते आणि साथीच्या आजारानंतर ते त्यांच्यापासून वेगळे झाले होते.
तर याचिकाकर्ता आणि त्याचे मृत पावलेले मुलगा आणि सून हे वेगळे राहत होते असा युक्तिवाद मुलाच्या मामीच्या वकिलांनी केला आहे. तर मुलाच्या आईचे आई वडिल आणि मामी हे सगळे मात्र एकत्र राहतात. या गोष्टी तपासून गुजरात उच्च न्यायालयाने मुलाचा ताबा त्याच्या मामीकडे दिला होता. पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायमूर्ती एनआर शहा आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर पुन्हा प्रकाश टाकत, तो कोरोनापूर्वी त्याच्या वडिलांच्या आई वडिलांसोबत राहत होता, तिथे तो राहू शकतो असे म्हणले आहे. त्यांनी सांगितले की, “आजोबांचे वय ७१ वर्षे आणि आजीचे वय ६३ वर्षे हे फार जास्त नाही. त्यांना इच्छा आहे तर ते नातवाची काळजी घेऊ शकतात. यातून त्यांना उर्जा आणि आनंद मिळेल. त्यामुळे वय हे कारण असू शकत नाही.”
उच्च न्यायालयाच्या २ मेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आजी-आजोबा म्हातारे झाले आहेत आणि ते जास्त काळ मुलाची काळजी घेऊ शकणार नाहीत या आधारावर गुजरात उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला होता. दुसरीकडे, मुलाची मामी तरुण असून ती नोकरीही करते, असे न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मात्र दुसऱ्या बाजूनीही पुरेसा विचार केला असून, त्यावर येत्या गुरुवारी निकाल देण्यात येणार आहेत