नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वअर्जित मालमत्तेचा मालक एखादा हिंदू पुरुष आपल्या पत्नीला मर्यादित मालमत्ता देण्याचे मृत्यूपत्र नमूद करत असेल, तसेच पत्नीच्या देखभालीसह सर्व पैलूंंवर काळजी घेतली जात असेल तर ती मृत्यूपत्रात लिहिलेल्या मालमत्तेची कायमस्वरूपी मालक असू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्या खंडपीठाने ५० वर्षे जुन्या एका प्रकरणात हा निर्णय दिला आहे. तसेच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णयही रद्द केला आहे.
हरियाणातील जुंडला गावातील रहिवासी तुलसी राम यांनी १५ एप्रिल १९६८ साली मृत्यूपत्र बनवले होते. पुढील वर्षी १७ नोव्हेंबर १९६९ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. तुलसी राम यांनी आपल्या स्थावर मलमत्तेला दोन भागात विभागले होते. त्यांनी मृत्यूपत्रात आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलाला आणि दुसऱ्या पत्नीच्या नावावर निम्मी-निम्मी मालमत्ता दिली होती. मालमत्तेच्या वाटणीत मोठा फरक होता. त्यांनी आपल्या मुलाला अर्ध्या मालमत्तेचा पूर्ण मालक केले होते. पत्नीची आयुष्यभर देखभाल व्हावी म्हणून पत्नीच्या नावावर मर्यादित मालमत्ता केली होती. दुसऱ्या पत्नीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण मालमत्तेवर मुलाचा हक्क असेल, असेही तुलसी राम यांनी मृत्यूपत्रात लिहिले होते. खंडपीठ म्हणाले, की त्यामुळेच राम देवी यांच्याकडून मालमत्ता खरेदी करणाऱ्यांचासुद्धा मालमत्तेवर कोणताच हक्क नाही. त्यांच्या बाजूने विक्रीच्या कागदपत्रांना कायम ठेवले जाऊ शकत नाही. मृत्यूपत्रानुसार, राम देवी यांना मर्यादित रूपात मिळालेली मालमत्ता विक्री करणे किंवा दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करण्याचा कोणताही हक्क नाही.