नवी दिल्ली – किरकोळ कारणासाठी देखील आजच्या काळात कोणीही उठतो आणि कोर्टात धाव घेतो, परंतु त्यामध्ये कोर्टाचा अत्यंत अमुल्य वेळ वाया जातो .याला चाप बसविण्यासाठी कोर्टाने एका महिलेला चक्क दंड ठोठावला आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातील एका महिलेने तिच्या पतीने बांधलेले “कोरोना माता मंदिर” पाडल्याच्या विरोधात दाखल केलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला. कारण तिने न्याय प्रक्रियेचा गैरवापर केला असे म्हटले आहे. तसेच मग आतापर्यंत, याचिकाकर्त्याने या देशातील लोकांना संक्रमित होणाऱ्या इतर सर्व संभाव्य आजारांसाठी मंदिरे बांधली नाहीत ? असे खंडपीठाने म्हटले आहे. तसेच नोंद केल्याप्रमाणे जमीन वादग्रस्त होती. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. तरीही गावातील राधेश्याम वर्मा यांना त्याचे पुजारी नेमण्यात आले, त्यानंतर तेथे पूजा करण्यास सुरुवात केली. कारण जमीन बळकावण्यासाठी हे मंदिर बांधण्यात आले आहे.