नवी दिल्ली – मालमत्ता वाटपावरून किर्लाेस्कर बंधूंमध्ये सुरू असलेला वाद सामोपचाराने मिटवावा, अशा सूचना सर्वाेच्च न्यायालयाने दिल्या आहेत. याचबरोबर, खंडपीठाने या प्रकरणात कोणताही आदेश दिलेला नाही. सर्वाेच्च न्यायालयाचा हा आदेश पुण्यातील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातही लागू असेल.
किर्लाेस्कर ब्रदर्स लिमिटेडचे (केबीएल) मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लाेस्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी सर्व प्रतिवादींना सामोपचाराने मार्ग काढण्यास सांगितले आहे. तसेच नोटीस जारी करत सहा आठवड्यांत उत्तर मागवले आहे.
दिवाणी खटले कसे चालतात, किती काळ चालतात, याची तुम्हाला माहिती असेलच. पण, प्रतिष्ठित व्यावसायिकांपैकी एक असलेल्या किर्लाेस्कर समूहला याचा अनुभव मिळावा, असे आम्हाला वाटत नाही, असे सर्वाेच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. आम्हाला व्यवस्थेवर टीका करायची नाही, पण आपापसांत बसून ही गोष्ट सामोपचाराने सुटू शकते. सगळे वकील एकत्र बसून यावर तोडगा काढू शकतात, असे न्यायालयाने सुचवले आहे. तुम्हाला बाहेरील कोणाची मदत हवी असल्यास, आम्ही सेवानिवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करू शकतो.
अतुल आणि राहूल किर्लाेस्कर हे दोघे यात पक्षकार आहेत. या दोघांच्या चार कंपन्यांनी किर्लाेस्कर समुहाच्या १३० वर्षे जुन्या प्रतिमेला छेद दिल्याचा आरोप संजय किर्लाेस्कर यांनी सेबीसमोर केला होता. त्याचबरोबर ग्राहकांना, कंपनीसोबत असलेल्या जुन्या लोकांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अतुल आणि राहूल किर्लाेस्कर यांनी १६ जुलै रोजी आपल्या कंपन्यांचा नवीन ब्रँड आणि लोगो प्रसिद्ध केला. यामुळे कंपनीच्या इतकी वर्षे जुनी प्रतिमा मलीन होत असल्याचे संजय किर्लाेस्कर यांचे म्हणणे आहे.