नवी दिल्ली – कुठल्याही निर्णयावर आक्षेप, कुठल्याही योजनेवर आक्षेप, छोट्या मोठ्या घटना घडल्या की लगेच न्यायालयात धाव घ्यायची, या प्रकारावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपण सारे सामूहिकरित्या न्याय प्रणालीची थट्टा करतोय, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने खडसावले आहे. अतिशय तुच्छ व निरर्थक याचिकांमुळे हैराण झालेल्या न्यायालयाने एकूणच व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली.
निरर्थक याचिकांचा पूर आल्यामुळे वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांची प्रकरणे निकालात काढण्यास विलंब होत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर अपील दाखल करण्याची सवय आता लोकांनी सोडली पाहिजे, असेही न्यायालय म्हणाले. न्या. संजय किशन कौल आणि न्या. ह्रषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने या बाबतीत नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य माणसाला आपल्या बारकाव्यांशी आणि कायद्यातील मोठमोठ्या सिद्धांतांशी काहीही एक घेणेदेणे नाही. पण आपण न्यायालयात आपण सातत्याने त्यावरच चर्चा करीत असतो.
एका याचिकाकर्त्याला केवळ त्याच्या याचिकेत काही दम आहे की नाही, हे जाणण्यासाठी उत्सुक असतो आणि त्यासाठी तो अनिश्चित काळापर्यंत प्रतीक्षा करू शकत नाही. निर्णय यायला 10-20 वर्षे लागली तर त्या निर्णयाचा त्याला काय फायदा आहे, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. न्या. कौल म्हणाले की, ‘काही दिवाणी खटले तब्बल 45 वर्षांपासून प्रलंबित आहेत.
आम्ही याप्रकारचे खटले निकाली काढत आहोत. व्यक्तिगतरित्या मी जुन्या प्रकरणांना आता बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे.’ मुळात मंगळवारी खंडपीठापुढे अनेक प्रकरणे आली होती. यात अंतरिम दिलाश्यासाठी एकामागोमाग एक अर्ज दाखल होत असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. त्यामुळे खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
आमच्यावर न्यायालय असते तर…
प्रत्येक प्रकरणात अपील दाखल करण्याची प्रथा आपण संपुष्टात आणली पाहिजे. आपण तथ्य तपासण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावरचा तपास करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या वरही एखादे न्यायालय असते तर तिथेही आमच्या निर्णयांना आव्हान दिले गेले असते. कुठे ना कुठे तर आपल्याला थांबावेच लागेल.