नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील आरोपीने त्याचे युझर नेम आणि पासवर्ड अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) देण्याच्या आदेशाचे पालन न केल्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने म्हटले की, “आम्ही जिल्हा न्यायालय नाही, जिथे तुम्ही आदेशांसोबत खेळू शकता.” न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने आरोपीला इशारा दिला की जर त्याने न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशांचे पालन केले नाही तर त्याच्यावरील खटले रद्द करण्याची याचिका फेटाळण्यात येईल.
खंडपीठाने अजय भारद्वाज नावाच्या व्यक्तीची बाजू मांडणारे अधिवक्ता पीसी सेन यांना सांगितले की, आमच्या आधीच्या आदेशात वापरकर्तानाव आणि पासवर्ड नमूद असताना तुम्ही ते का सांगितले नाही? कोणतेही पालन न झाल्यास, आम्ही रिट याचिका फेटाळून लावू. सर्वोच्च न्यायालय हे जिल्हा न्यायालय नाही जिथे तुम्ही आदेश घेऊन खेळू शकता. तुम्ही युझर नेम आणि पासवर्ड जमा कराल असं सांगूनही आतापर्यंत कोणतेही अनुपालन केलेले नाही. हे तीस हजारी न्यायालय नाही.
आरोपींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे म्हणाले की, पुणे पोलिसांनी सर्व संबंधित कागदपत्रे, ईमेल आयडी आणि पासवर्ड जप्त केले आहेत, ज्यात दोन क्रिप्टोकरन्सी वॉलेटशी लिंक आहेत. ईडीला क्रिप्टो करन्सीचे बारकावे समजत नाहीत, पण पुणे पोलिसांना समजते. त्यांनी क्रिप्टोकरन्सी वॉलेटचा यूजर आयडी आणि पासवर्ड जप्त केला आहे आणि पासवर्डही बदलला आहे. त्यांनी माझ्या वॉलेटमधून १८०० रुपये ट्रान्सफर केले आणि पुणे पोलिसांनी माझे बिटकॉइन्स हस्तांतरित करण्यात गुंतलेल्या दोन पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. ते म्हणाले की, त्यांचा क्लायंट त्याचा युझर आयडी आणि पासवर्ड ईडीला देण्यात टाळाटाळ करत नाही. परंतु हे काम त्याच्या वकिलाच्या उपस्थितीत केले पाहिजे.