विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या माध्यमातून ग्राहकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच खडे बोल सुनावले. हेच पदार्थ तुम्ही आपल्या मुला–बाळांना, कुटुंबाला खायला देणार का, असा सवाल करीत आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला.
न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. एमआर शाह यांच्या खंडपीठाने प्रवर गोयल आणि विनित गोयल या आरोपींचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावरील सुनावणी सुरू होती. आरोपांमध्ये तथ्य नसल्यामुळे दोघांनाही जामीन मिळावा, अशी विनंती वकिलांनी केली. त्यावर दोन्ही आरोपी आपल्या कुटुंबाला भेसळयुक्त पदार्थ खायला देण्यास तयार होतील का, असा सवाल न्यायालयाने केला. त्यांची तयारी असेल तर आम्ही लगेच जामीन देऊ, असेही न्यायालय म्हणाले. यावर आरोपींच्या वकिलांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे ‘लोकांना मरू द्या, आम्हाला त्याचे काय?’ अशी भूमिका सोडण्याची गरज आहे, असेही न्यायालयाने सुनावले.
याचिका मागे
खाद्य पदार्थांमधील भेसळीच्या प्रकरणांवर न्यायालयाने चिंता व्यक्त केली. या संदर्भातील आरोपांच्या बाबतीत आपला देश खूप उदार आहे, असे निरीक्षण नोंदवत दोघांनाही जामीन मिळणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर याचिका मागे घेण्यात आली.
असे होते प्रकरण
मध्यप्रदेशातील नीचम येथे गेल्या वर्षी हे प्रकरण पुढे आले होते. गव्हाला रंगाचे पॉलिश करून आरोपी विकत होते. डिसेंबर २०२० ला धाड पडल्यानंतर आरोपींच्या भागातून हजारो किलो पॉलिश केलेला गहू जप्त करण्यात आला.