नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- २०१३ मध्ये नाशिक येथील एकनाथ कुंभारकर याने आपली आंतरजातीय विवाह केलेली गर्भावती मुलगी प्रमिला हिचा गळा दाबून खून केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यामागचा शोध घेऊन त्या खूनामागे जातपंचायतचा हात असल्याचे शोधून काढले होते. तेव्हापासून जातपंचायतचे दाहक वास्तव प्रथमच समाजासमोर आले होते. प्रमिलाचे बलिदान व्यर्थ गेले नाही. कारण तिच्या खूनानंतर २०१७ मध्ये महाराष्ट्र सरकाराने जातपंचायतच्या मनमानी विरोधात कायदा केला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे
आरोपी यास नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने ती कायम केली. आता सर्वोच्च न्यायालयाने मात्र वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. महाराष्ट्र अंनिस या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदर असून स्वागत करत असल्याचे जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.
पुन्हा असे प्रकार होणार नाही
सदर ऑनर किलींग नंतर नाशिक येथील पुरोगामी संघटनांनी निषेध मोर्चा काढला होता. अंनिसने जातपंचायतचा लढा त्यामुळेच सुरु केला.ह्या शिक्षेमुळे जातपंचायती व ऑनर किलींग यांना आळा बसेल. पुन्हा असे प्रकार होणार नाही, यासाठी वचक बसेल”
-कृष्णा चांदगुडे,
राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान.