नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे अतिशय संतप्त झाले. ते म्हणाले की, मणिपूरमध्ये महिलांसोबत जे काही झाले ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे. यावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी. सरकारने कारवाई न केल्यास आम्ही करू, असे सज्जड दम न्यायालयाने दिला आहे.
सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठ म्हणाले की, जातीय संघर्षाच्या क्षेत्रात महिलांचा वस्तू म्हणून वापर करणे हे संविधानाचे उल्लंघन आहे. या घटनेचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो अतिशय अस्वस्थ करणारा आहे. आम्ही सरकारला थोडा वेळ देत आहोत. यापुढे जमिनीवर (ग्राऊंडवर) काहीही झाले नाही तर आम्ही स्वतः कारवाई करू.
या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याबाबत केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारला न्यायालयाने निर्देश दिले. तसेच, काय कार्यवाही केली त्याचा अहवाल देण्याचेही बजावले आहे. या घटनेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये जे काही दाखवले गेले आहे आणि या हिंसाचारात महिलांचा वापर केला जात आहे तो घटनात्मक लोकशाहीच्या आत्म्याविरुद्ध आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याबाबतच्या सर्व पावलांची माहिती द्यावी. सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी पुढील शुक्रवारपर्यंत तहकूब केली.
मणिपूर सध्या वांशिक हिंसाचाराच्या विळख्यात आहे, परंतु आता एका व्हिडिओवरून मणिपूरच्या डोंगराळ भागात तणाव पसरला आहे, ज्यामध्ये दोन महिलांची नग्न परेड केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ ४ मे रोजीचा आहे. दोन्ही महिला कुकी समुदायातील आहेत. महिलांची नग्न धिंड काढणारे पुरुष हे सर्व मेईतेई समुदायातील आहेत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी संघटना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने केली आहे.
दरम्यान, अज्ञात सशस्त्र बदमाशांच्या विरोधात थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलिस ठाण्यात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.