नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात काहीही अशक्य नाही. त्यातल्या त्यात उत्तरप्रदेशात तर मुळीच नाही. उत्तर प्रदेशातील एक घटना अलाहबाद उच्च न्यायालयात पोहोचली आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांची दखल सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करून घेतली.
उत्तर प्रदेशात एका तरुणाने त्याच्या मैत्रीणीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले. बरेच दिवस प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत राहिला. त्यामुळे ती शारीरिक संबंध प्रस्थापित करायलाही तयार झाली. पण बरेच दिवस शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने त्याच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रियकरावर गंभीर गुन्हे दाखल करून घेत अटकेची कारवाई केली.
प्रियकराने जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे प्रियकराने अलाहबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे लग्नाला नकार दिल्याचे अजब गजब कारण प्रियकराने दिले. मुलीला मंगळ दोष असल्यामुळे लग्न करू शकणार नाही, असे प्रियकराने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने मुलीला खरच मंगळ आहे का, हे तपासण्याचे आदेश यंत्रणेला दिल्यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत सुमोटो दाखल करून घेतली आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
लखनौ ज्योतिषशास्त्र विभागाकडे काम
अलाहबाद उच्च न्यायालयाने मुलीला मंगळ आहे का, हे तपासण्याचे काम लखनौ ज्योतिषशास्त्र विभागाकडे सोपवले होते. त्यामुळे अलाहबाद उच्च न्यायालयाचा हा निर्णय चांगलाच ट्रोल झाला.
संबंध ठेवताना कुठे होता मंगळ?
ज्या प्रियकराने एवढे दिवस आपल्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्याला लग्न करतानाच मंगळ का आठवला? संबंध ठेवले तेव्हा मंगळ असल्याचे आठवले नाही का, असा सवाल प्रियकराला सोशल मिडियावर विचारला जातोय.
Supreme Court Legal Mangal Girl