इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – “मला मारहाण झाली. तासनतास बाथरूममध्ये कोंडून ठेवले गेले. मला माझ्या आईशी बोलायचे नाही”, असे म्हणत एका मुलाने आपल्या अत्यंत क्लेशदायक बालपणाची आठवण सर्वोच्च न्यायालयात सांगितली. सर्वोच्च न्यायालयात वैवाहिक विवाद प्रकरणाची सुनावणी सुरू होती. ज्यामध्ये पती गेल्या दोन दशकांपासून पत्नीकडून घटस्फोटाची मागणी करत आहे. त्याची पत्नी त्याला विरोध करत आहे.
जेव्हा आईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने खंडपीठाला सांगितले की, ‘आईला त्याच्या मुलाशी बोलण्याची परवानगी द्या, कारण तो त्याच्या वडिलांसोबत राहतो’. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मुलाला आईशी बोलण्यास सांगितले. २७ वर्षीय मुलाने कोर्टात सांगितले की, तो ७ वर्षांचा असताना त्याची आई त्याला मारहाण करायची. त्याला तासनतास बाथरूममध्ये कोंडून ठेवायची. आईशी बोलल्याने त्याच्या वेदनादायक आठवणी परत आठवतात. कोणती आई आपल्या ७ वर्षाच्या मुलाला मारते? बाथरूममध्ये कोंडून ठेवते? माझ्या वडिलांनी कधीही माझ्यावर हात उचलला नाही, असंही तो म्हणाला. महिलेच्या वकिलाने सांगितले की, “मुलगा बनावट कथा सांगत होता. असे काही घडले नाही. खंडपीठाने सांगितले की तो २७ वर्षांचा मुलगा आहे. त्याची स्वतःची समज आहे. त्याला कथा सांगण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.
पतीची बाजू मांडताना वकील अर्चना पाठक दवे यांनी सांगितले की, महिलेने आपल्या मुलाच्या ताब्यासाठी कधीही न्यायालयात धाव घेतली नाही. अनेक दशके जुना वाद शांत व्हावा, अशी पतीची इच्छा आहे. १९८८ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. २००२ मध्ये पतीने क्रूरतेचे कारण देत घटस्फोट मागितला होता. तो वेगळा राहू लागला. गेल्या दोन दशकांपासून त्यांचे नाते घटस्फोटाच्या प्रकरणात अडकले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने मुलाला त्याच्या आईशी बोलण्यासाठी वळवण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.