नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र सरकार नीट एसएस (सुपर स्पेशियलिटी) परीक्षा सध्याच्या शैक्षणिक वर्षात जुन्या पद्धतीनुसार घेण्यासाठी तयार झाले आहे. या वर्षी नीट एसएस परीक्षा जुन्या पॅटर्नप्रमाणे आयोजित करणार असल्याची माहिती केंद्राने बुधवारी न्यायालयात दिली. परंतु पुढील वर्षी (२०२२-२३) पासून ही परीक्षा नव्या पॅटर्नप्रमाण घेण्यात येणार आहे.
न्यायमूर्ती डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती विक्रम नाख आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने सरकारची बाजू मांडणार्या अतिरिक्त महाधिवक्ता ऐश्वर्या भाटी यांचे दावे नोंदवून विद्यार्थ्यांच्या प्रलंबित याचिकांचा निपटारा केला. जुन्या पॅटर्नप्रमाणे परीक्षा घेण्याच्या आयोजनासाठी केंद्राने दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे.
पद्धतीत सुधारणा करण्यासाठी तसेच नीट सुपरस्पेशिएलिटी परीक्षा २०२१ मध्ये केलेल्या बदलांना मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्राला शेवटची संधी दिली होती. नीट एसएस परीक्षा पॅटर्नमध्ये शेवटच्या क्षणाला बदल केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला २७ ऑगस्टला फटकारले होते.
सत्तेच्या खेळात युवा डॉक्टरांना सरकार फुटबॉल करत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. ४१ स्नातकोत्तर डॉक्टरांतर्फे दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. हे प्रकरण डॉक्टरांच्या भविष्याशी निगडित आहे. युवा डॉक्टरांना काही असंवेदनशील नोकरदारांच्या दयेवर सोडू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.