नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विविध भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडताहेत. मणिपूर पेटत आहे, पश्चिम बंगालमध्येही तणाव आहे. अशात आता हरियाणातील नूंह भागात सामुदायिक हिंसाचार सुरू झाला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे.
नूंहमध्ये पसरलेल्या हिंसाचारामुळे हरियाणात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती खन्ना यांनी मुख्य कारण काय, अशी विचारणा केली. त्यावर याचिकाकर्त्याचे वकील सीयू सिंह म्हणाले की, हे एका समुदायाविरुद्ध हेट स्पीच प्रकरण आहे. सभा घेऊन हेट स्पीच दिले जात आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला निर्देश दिले की, हेट स्पीच संदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन करावे.
यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तसेच हिंसाचार किंवा हेट स्पीच होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहे. दरम्यान तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. संवेदनशील भागात अतिरिक्त खबरदारी घेण्यात यावी, तसेच अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करून सीसीटीव्ही व व्हिडिओग्राफी करण्याच्या सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत. नूंह प्रकरणात सरन्यायाधीशांसमोर लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, रजिस्ट्रारला तात्काळ मेल पाठवा, आम्ही तात्काळ या प्रकरणाच्या सुनावणीचे आदेश देऊ.
हेट स्पीचमुळे बिघडतंय वातावरण
नूंहमध्ये स्थिती गंभीर आहे. दिल्ली एनसीआरमध्ये २३ सभा होत आहेत, त्यावर लवकर सुनावणी होणे गरजेचे आहे. शिवाय शेजारच्या राज्यातही हिंसाचार झाला आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले की, हेट स्पीचमुळे वातावरण बिघडते यात वाद नाही. कायद्याचे राज्य राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑगस्टरोजी होणार आहे. नूंहमध्ये उसळलेला जातीय हिंसाचार गुरुग्रामसह राज्याच्या अनेक भागात पसरला आहे, असे सीयू सिंह यांचे म्हणणे आहे.
supreme court haryana nuh violence chief justice
sc legal dhananjay chandrachud hearing