नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लखनौमधील वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याने इतरांना त्रास देऊनही त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढू नये, असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. हा निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, “मुलांनी वृद्ध आई-वडिलांचा त्याग करणे हे आता जीवनाचे कठोर वास्तव बनले आहे.” परिणामी वयाच्या उतारावर त्यांना वृद्धाश्रमात राहावे लागते, पण वृद्धाश्रमात राहताना कोणीही तिथे राहणाऱ्या इतर ज्येष्ठांना त्रास देऊ शकत नाहीत. वृद्धाश्रमात चांगली वागणूक ठेवण्याचे कर्तव्य प्रत्येकाला पाळायला हवे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने लखनौमधील ‘समर्पण वरिष्ठ जनपरिसर’ या वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध जोडप्याला घराबाहेर न काढण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना ही टिप्पणी केली. पालक मुलांकडे लक्ष देत नाहीत ही दुर्दैवी परिस्थिती आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. आई-वडिलांचा मुलांनी त्याग करणे हे आता जीवनाचे कठोर वास्तव आहे.
वयाच्या या टप्प्यावर वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात राहावे लागते, या परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. वयोमानाच्या उतारावर वृद्धाश्रमात राहण्यास भाग पाडल्या जाणाऱ्या वृद्धांवर आघात होतो, परंतु त्यांच्या दुःखामुळे इतर समवयस्कांना किंवा वृद्धाश्रम चालवणाऱ्यांना ते त्रास देऊ शकत नाही.
खंडपीठाने म्हटले आहे की वृद्धाश्रमात राहणाऱ्यांनी किमान स्तरावर शिस्त आणि चांगली वागणूक पाळणे अपेक्षित आहे. त्यांच्यासोबत आणखी ज्येष्ठ नागरिक राहत असल्याने कोणीही एकमेकांना त्रास देऊ नये. खंडपीठाने सांगितले की वृद्धाश्रमाचे प्रशासन त्यांचा परवाना रद्द करण्यास आणि वृद्धाश्रमातील इतर सहकाऱ्यांना त्रास देत असल्यास आणि त्यांना रहायला दिलेली जागा रिकामी करण्यास सांगण्यास मोकळे आहे. त्रास देणाऱ्या वृद्ध जोडप्याची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही खंडपीठाने दिल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश राज्य विधी सेवा प्राधिकरणाला पॅरा कायदेशीर स्वयंसेवक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरुन वृद्धाश्रमाला वेळोवेळी भेटी देत तिथली परिस्थिती जाणून घेता येईल. त्याचबरोबर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनाही महिन्यातून एकदा तरी वृद्धाश्रमाला भेट देण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून तेथील लोकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करता येईल.