इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही प्रकारच्या अपघाताच्या बाबतीत, त्याच्या भरपाईची रक्कम सरळ, ठराविक अशी असू शकत नाही. ती प्रत्येक प्रकरणाच्या तथ्यानुसार आणि परिस्थितीवर अवलंबून राहील. त्यामुळेच त्यात भिन्नता असेल, असे सुप्रीम कोर्टाने एका सुनावणीदरम्यान म्हटले आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्सविरोधात बेन्सन जॉर्ज यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि बा. वी. नागरत्ना यांच्या दुहेरी खंडपीठाने सांगितले की, अपघातानंतर भरपाईचा दावा करणारा व्यक्ती त्याच्यासोबत घडलेल्या स्थितीशी संबंधित घटकांवर भरपाईसाठी अवलंबून असेल. दावेदारांचे दुःख, वेदना आणि आघात याची भरपाई पैशांच्या स्वरुपात होऊ शकत नाही. इन्श्युरन्स कंपन्यांनी ठरवून दिलेली रक्कमच भरपाई रक्कम असू शकत नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, अशा प्रकरणांमध्ये दावेदार आणि त्याच्या कुटूंबाला झालेला त्रास बघणे देखील महत्त्वाचे आहे. अपघातानंतर दावेदाराची स्थिती काय आहे. तो पूर्वीसारखा जगू शकतो का? खंडपीठाने असेही निरीक्षण नोंदवले आहे की दावेदाराने जीवनातील आनंद गमावला आहे का हे पाहणेही आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यामध्ये नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली.
बेन्सन जॉर्ज या याचिकाकर्त्याने भरपाई मिळालेली रक्कम अपूर्ण असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सर्व वस्तुस्थिती विचारात घेतल्यानंतर अपघाताचे दुःख आयुष्यभर भोगावे लागणार असल्याचे मान्य केले. सर्वोच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने पीडितेची भरपाई 1 कोटी 24 लाख 94 हजार 333 रुपयांवरुन वाढवून 1 कोटी 41 लाख 94 हजार 333 रुपये केली. न्यायालयाने म्हटले आहे की, नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी एकच फॉर्म्युला स्वीकारण्याऐवजी, पीडित आणि त्यांच्या कुटुंबाची स्थिती पाहि.ली पाहिजे. त्याआधारे नुकसान भरपाईची रक्कम ठरवावी. प्रत्येक अपघातात पीडितेची स्थिती सारखी असू शकत नाही अशा परिस्थितीत, अपघाताच्या प्रत्येक प्रकरणात भरपाईची रक्कम परिस्थितीनुसार बदलू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.