नवी दिल्ली – पती-पत्नींमधील वाद थांबवून त्यांना एकत्र आणण्याचे काम न्याय प्रणालीने अनेकदा केले आहे. पण न्यायालय तेवढ्यावर थांबत नसते. अश्या खटल्यांचे निकाल लावल्यानंतरही न्यायालय पुढे जोडप्यांच्या आयुष्यात सारे काही आलबेल आहे की नाही, यावर लक्ष ठेवून असते. असेच एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच निकाली काढले. वादातून एकमेकांपासून लांब असलेल्या पती-पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने एकत्र आणले.
पतीने-पत्नीच्या स्वाभिमानाचा आदर ठेवत तिला घरी घेऊन जायचे आणि तिच्याविरुद्ध केलेले सर्व आरोप मागे घ्यायचे, असे आदेश न्यायालयाने दिले. विशेष म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला. पती-पत्नी एकत्र आले असले तरीही त्यांच्यावर काही दिवस न्यायालयाची निगराणी असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने पाटणा येथील एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी केली.
याचिकाकर्त्याचे गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पत्नीसोबत वाद सुरू होते आणि हे सारे वाद न्यायालयात आले होते. पतीने सुनावणीसाठी पत्नी व्हिडीओ कॉन्फरन्सवर उपस्थित रहावी, अशी विनंती केली होती. त्यावर माहेरी रांची येथे असलेली महिला सुनावणीला हजर झाली. तिने सुरुवातीला सासरी परतण्याची तयारी असल्याचे सांगितले. मात्र पतीने टॉर्चर करू नये, अशी अट त्याने ठेवली. त्यावर पती केवळ हात जोडून सुनावणीला बसला होता.
न्यायालयाने पत्नीच्या विरुद्धचे सर्व खटले मागे घेण्याची तयारी आहे का, असे विचारल्यावर त्याने होकार दिला. कारागृहात असलेल्या पतीला न्यायालयाने कठोर शब्दात समज दिली. जामीन मिळविण्यासाठी नाटक करायचे नाही, अऩ्यथा पुन्हा कारागृहात रवानगी करू, असेही न्यायालय म्हणाले. पतीने दोन आठवड्यांच्या आत शपथपत्र सादर करावे आणि पत्नीच्या विरुद्ध दाखल केलेल्या सर्व याचिका मागे घ्याव्या, असे आदेश न्यायालयाने दिले.