नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेकवेळा याचिकाकर्ते आणि वकिलांना कठोर शब्दात सुनावल्याचे आपल्याला माहिती आहे. विरोधीपक्ष असो व सरकार असो त्यांनी स्पष्ट शब्दात ऐकवताना मागेपुढे बघितले नाही. याच मालिकेत आता आणखी एका वकिलाला त्यांनी खडे बोल सुनावले आहेत.
एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांची यादी नीट केली जात नसल्याची कैफियत याचिकेद्वारे मांडली. त्यावेळी सरन्यायाधीश विविध याचिकांवरील सुनावणी क्रमाने घेत होते. यात संबंधित वकिलाचा क्रमांक लागला आणि त्याच्या याचिकेचा विषय ऐकताच त्यांचा संताप झाला. अनेक मुद्यांवर रोखठोक भाष्य करणारे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या वकिलाचा चांगलाच समाचार घेतला.
वकिलाची रिट याचिका बघताच ते म्हणाले, ‘ही कसली रिट याचिका आहे. आता या क्षणी १४० याचिकांवर मी सुनावणी घेत आहे.’ सरन्यायाधीश विविध विषयांवरील याचिकांवर सुनावणी घेत असतानाच याचिकांची यादी व्यवस्थित केली जात नाही, अशी तक्रार वकिलाने केली. त्यामुळे सरन्यायाधीशांचा संताप झाला. ‘सर्वोच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांची यादी चुकीच्या पद्धतीने केली जाते. संवेदनशील प्रकरणांकडे लक्ष दिले जात नाही. महत्त्वाच्या नसलेल्या याचिकांवर पहिले सुनावणी घेतली जाते. त्यामुळे प्रकरणांची यादी सॉफ्टवेअरद्वारे करावी आणि संवेदनशील प्रकरणांना प्राध्यान्य ध्यावे,’ असे वकिलाने सुनावणीच्या वेळी म्हटले. त्यानंतर सरन्यायाधिशांनी त्याला चांगलेच सुनावले.
तुम्हाला काही माहिती आहे का?
सर्वोच्च न्यायालयात प्रकरणांची यादी करण्यासाठी सॉफ्टवेअरचाच वापर केला जातो. सध्या १४० केसेस सुरू आहेत. तुम्हाला काही माहिती आहे का?, या शब्दांत सरन्यायाधिशांनी वकिलाचा समाचार घेतला. सर्वोच्च न्यायालय कसे काम करते हे तुम्हाला माहिती आहे का, असा सवालही त्यांनी वकिलाला केला. त्यानंतर सरन्यायाधिशांनी ही याचिका फेटाळून लावली.
Supreme Court CJI Chandrachud on Advocate