नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा पारा भडकला. अतिशय शांतचित्त आणि एकाग्रवृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रचूड यांचा पारा चढल्याने उपस्थित सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.
मागील काही वर्षांमध्ये लहानसहान कारणांवरून कोर्टात याचिका दाखल करण्याचे प्रकार वाढले आहेत. छोट्या कारणांवरून जनहित याचिका दाखल होताहेत. यामुळे न्यापालिकेवरील ताण वाढत आहे. प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. याचा प्रभाव निकाल गतीशीलतेने देण्यावर होत आहे. परिणामत: न्यायाधीशदेखील त्रस्त आहेत. असेच एक प्रकरण सरन्यायाधीयांपुढे आले असता ते चांगलेच भडकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केरळमध्ये वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. पण या ट्रेनला जे थांबे आहेत त्यामध्ये एक अतिरिक्त थांबा देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका एका याचिकाकर्त्याने थेट सुप्रीम कोर्टात दाखल केली. ही याचिका सुनावणीसाठी आल्याने त्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड भडकले. तसेच यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की,‘आता कुठल्या स्टेशनवर ट्रेन थांबावी हे पण आम्हीच ठरवावे असे तुम्हाला वाटते का?” तसेच पुढे बोलताना सरन्यायाधीश म्हणाले, हे धोरणात्मक निर्णयाचं प्रकरण आहे, त्यामुळं ते निकाली काढण्यात येत आहे. त्यामुळे ही याचिका अखेर निकाली निघाली.
मागील काही दिवसांपासून चर्चेत
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी अनेक प्रकरणावर महत्वपूर्ण निर्णय दिले आहेत. कोर्टातील सुनावणीदरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यांची देखील कोर्टाबाहेर चर्चा होते. काही दिवसांपूर्वीव ते कोर्टात एक वकीलावर भडकले होते. ते प्रकरणदेखील बरेच गाजले होते. त्यानंतर आता याचिकाकर्त्यावर व्यक्त केलेला संताप चर्चेचा विषय बनला आहे.