नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी बीएड पदवीधारकांना खूपच महत्त्व होते. कारण बीएड केल्यानंतर लगेच शिक्षकाची नोकरी मिळत असे, परंतु अलीकडच्या काळात बीएड धारकांची प्रचंड संख्या वाढली असून त्यांना माध्यमिक शिक्षकाची नोकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे निदान प्राथमिक शिक्षकांची तरी नोकरी मिळावी, अशी त्यांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होते. मात्र या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत बीएड पदवीधारक उमेदवार प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी अपात्र आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आलेल्या या निकालाचा बीएड आणि बीटीसीद्वारे अध्यापनाच्या क्षेत्रात जाणाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
यांना होणार फायदा
त्याच्या काळात शिक्षक होणे सोपी गोष्ट राहिलेली नाही कारण बीएड विरुद्ध बीटीसी डीएड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा जुना निर्णय कायम ठेवला आहे आणि प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी बीएड केलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये प्राथमिक शिक्षक भरतीसाठी फक्त बीटीसी उमेदवार पात्र ठरतील. हा निर्णय बीएड करणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का मानला जात आहे. बेसिक टीचर कोर्स म्हणजेच डीएड कोर्स केलेल्यांना त्याचा फायदा होणार आहे.बीएडवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, बीएड पात्र उमेदवार देशभरातील पीआरटी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत.
इतर राज्यांनाही लागू
सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या नियमामुळे राजस्थानमध्ये प्राथमिक शिक्षक भरतीतून बीएड उमेदवार बाहेर फेकले जातील, तर बीटीसी उमेदवारांची भरती केली जाईल. राजस्थान उच्च न्यायालयाने याआधी हा निर्णय दिला होता. आता केंद्र सरकार आणि एनसीपीईने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत कायम ठेवण्याचा निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यामुळे राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महत्त्व मिळालं असून बीएड पदवी प्राप्त सर्व उमेदवार आता प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होण्यास अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे बीएड पदवीधर प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होऊ शकणार नाहीत. बीएड आणि बीटीसी उमेदवारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा स्पष्ट अर्थ म्हणजे आता बी.एड उमेदवारांना यापुढे प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक बनता येणार नाही आणि फक्त बीटीसी उमेदवारांनाच प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक बनता येईल. सध्या तरी हा निर्णय राजस्थानमध्ये वैध असेल. पण पुढे जाऊन हा नियम राजस्थानसह इतर राज्यांतही लागू झाल्यास बी.एड उमेदवारांना मोठा फटका बसणार आहे.
Supreme Court Bed Graduate Candidates Teacher Eligibility
Legal Education Rajasthan High Court