मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रततेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात उत्तर देण्यासाठी अध्यक्षांना दोन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.
ही सुनावणी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर पार पडली. तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांनी अपात्रेसंबधी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती याचिकेमध्ये करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाची आहे. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या निकालात स्पष्ट केले आहे. त्यानंतर अपात्रेतेच्या कारवाईचे प्रकरण विधासभा अध्यक्षांकडे आले आहे. या सर्वास तीन महिने पूर्ण झाले तरी अद्याप अध्यक्षांनी निकाल दिलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात घेतली.