नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांच्यातील वाद आता आणखी एका नव्या वणळावर येऊन पोहोचला आहे. नागपूर पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे, त्यामुळे श्याम मानव यांनी आता थेट कोर्टात लढाई लढणार असल्याचा इशारा दिला आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरातील दिव्यदरबारात अंधश्रद्धेचा प्रसार होईल, असे कृत्य केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नागपूर शाखेने केला होता. त्यानुसार त्यांनी नागपूर पोलिसांत तक्रार देखील दाखल केली. त्यावर नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी दिव्यदरबार आटोपता घेतला. त्यावर श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना चमत्कार करून दाखवा ३० लाख देतो, असे जाहीर केले.
आता मात्र नागपूर पोलिसांनी अंधश्रद्धा पसरेल असा कुठलाच प्रकार घडल्याचे निदर्शनास आले नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यावर श्याम मानव यांनी आश्चर्य व्यक्त केलं असून शासनाच्याच समितीने केलेल्या तक्रारीकडे प्रशासन कसे काय दुर्लक्ष करू शकते, असा सवाल केला आहे. त्यामुळे आता न्यायालयात आव्हान देण्याशिवाय पर्याय नसल्याचेही श्याम मानव यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशांचा अवमान करणारे कृत्य नागपूर पोलिसांनी केले आहे.
दोघेही शासनाचाच भाग
शासनाच्याच समितीच्या वतीने धीरेंद्र शास्त्रींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता प्रशासनच गुन्हा दाखल करून घ्यायला नकार देत असेल, तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. मात्र तरीही आम्ही आमच्यावतीने आणखी एक प्रयत्न करणार आहे. कारण न्यायालयात जाताना आम्ही जे प्रयत्न केले, त्याचा अहवालही आम्हाला सादर करावा लागणार आहे, असे श्याम मानव म्हणाले.
काय म्हणाले होते राज्यमंत्री
यावेळी श्याम मानव यांनी २००५ च्या एका घटनेबद्दलही सांगितले. ते म्हणाले, ‘२००५ मध्ये तत्कालीन आदिवासी राज्यमंत्र्यांनी अंधश्रद्धेचा कायदा फक्त दलित आणि आदिवासींनाच लागू आहे, उच्चभ्रूंना नाही, असे म्हटले होते. त्यावेळी त्यांचा गैरसमज मी दूर केला होता. पण आता त्यांचेच म्हणणे खरे होते, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.’
Superstition Shyam Manav Decision Bageshwar Baba