मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील सुपरस्टार अशी ओळख असलेल्या रजनीकांत यांचा १२ डिसेंबर हा वाढदिवस. पण सुपरस्टार होण्याचा रजनीकांत यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांच्या आजच्या या यशात त्यांचे मित्र राज बहादूर यांचा मोठा हात आहे. अभिनेता होण्याचे रजनीकांत यांचे स्वप्न त्यांनीच जिवंत ठेवले.
रजनीकांत यांच्या घरची परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. रामोजी राव हे त्यांचे वडील. रजनीकांत हे त्यांचे चौथे अपत्य. ते पाच वर्षांचे होते, तेंव्हा त्यांची आई, जिजाबाई यांचे निधन झाले. आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती की, रजनीकांत यांना हमालांचे काम करावे लागले. थोडे मोठे झाल्यावर त्यांनी बस कंडक्टर म्हणूनही काम केले. परिस्थिती म्हणून त्यांनी ही कामे स्वीकारली असली तरी त्यांचे स्वप्न अभिनेता बनण्याचे होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी राज बहादूर यांनी रजनीकांत यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याबाबत सुचवले. हा सल्ला स्वीकारून रजनीकांत यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपूर्वा रागनगाल’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांच्याशिवाय कमल हसन आणि श्रीविद्या असे नामवंत कलाकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी केवळ निगेटिव्ह भूमिका साकारल्या. त्यांचा ‘बिल्ला’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि तेंव्हापासून ते चर्चेत आले. १९८३ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. चाहत्यांना त्यांच्याबद्दल इतके प्रेम आहे की, ते त्यांना देव समजतात. म्हणूनच बहुधा त्यांचे चित्रपट पहाटे रिलीज होतात.