मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांनी आपले चित्रपट आणि हटके अंदाजाने वेगळी ओळख बनवली आहे. राजेश खन्ना यांनी आखिरी खत या चित्रपटातून या क्षेत्रात पदार्पण केले होते. परंतु आराधना या सिनेमामुळे ते रातोरात सुपरस्टार झाले. राजेश खन्ना करिअरसह त्यांच्या अफेअरबद्दलही खूपच चर्चेत राहिले होते. एके काळी त्यांचे अभिनेत्री टिना मुनिमसोबत प्रेमाचे संबंध होते. परंतु यावरून राजेश खन्ना अभिनेता संजय दत्तच्या निशाण्यावर आले होते. काका या टोपन नावाने ओळखल्या जाणार्या राजेश खन्ना यांना मारहाण करण्यासाठी संजय दत्त चक्क मेहबूब स्टुडिओपर्यंत गेला होता.
संजय दत्त याने या गोष्टीचा खुलासा स्वतःच्या संजय दत्त ः द अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅड बॉय या जीवनचरित्रात केला होता. संजय दत्त जीवनचरित्रात लिहितो, की रॉकी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तो टिना मुनिम हिच्या प्रेमात पडला होता. परंतु अमली पदार्थ सेवन केल्याच्या वादात फसल्यानंतर टिना मुनिम त्याच्यापासून वेगळी झाली होती.
त्यादरम्यान टिना मुनिमचा राजेश खन्ना यांच्यासोबतचा सौतन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यासोबतच टिना मुनिम आणि राजेश खन्ना यांच्यातील अफेअरबाबत बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यामुळे संजय दत्त चांगलाच काळजीत पडला होता. टिना मुनिमबद्दल संजय आपल्या जीवनचरित्रात लिहितो, पूर्ण जगाला ठाऊक होते की, ती प्रत्येकाला मूर्ख बनवते. परंतु मी अंधाप्रमाणे वागलो आणि तिचा बचाव केला.
टिना मुनिम आणि राजेश खन्ना यांच्याबद्दल संजय दत्त लिहितो, जेव्हा आमचे संबंध संपले तेव्हा तिचे आणि राजेश खन्ना यांच्या अफेअरबद्दलच्या बातम्या समोर आल्या. मला वाटले की माझा वापर केला गेला. प्रत्येक जण माझ्यावर हसत होता. यावरून राजेश खन्ना यांना मारहाण करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. काका तेव्हा मेहबूब स्टुडिओमध्ये आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.
संजय दत्त राजेश खन्ना यांच्याबद्दल लिहितो, टिना मला जेव्हा सोडून गेली, तेव्हा मला काय झाले होते, काहीच कळाले नव्हते. मला फक्त राग येत होता. मला कोणीतरी सोडून गेले आहे हे मी सहनच करू शकत नव्हतो. त्यामुळे राजेश खन्ना यांना मारण्याची शपथच मी घेतली. मी मेहबूब स्टुडिओत पोहोचलो. तिथे ते खुर्चीवर बसले होते. मीसुद्धा खुर्ची ओढली आणि त्यांच्यासमोर जाऊन बसलो. मी त्यांच्याकडे रागाने बघत राहिलो आणि ते सुद्धा स्तब्ध झाले होते.