मुंबई – बॉलिवुडचे सुपरस्टार आणि लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेले प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे आज पहाटे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. यापूर्वीही त्यांना वेळोवेळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वारंवार अफवा पसरविल्या जात होत्या. अखेर या सुपरस्टारने जगाचा निरोप घेतला आहे.
दिलीप कुमार हे बॉलिवुडमधील सुपरस्टार आणि द फर्स्ट खान म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अभिनयावर लाखो चाहते फिदा होते. त्यामुळेच अनेक दशके त्यांचे अनेक चित्रपट गाजले. आजही त्यांच्या काही कलाकृती अजरामर आहेत. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ मध्ये झाला होता. त्यांचं संपूर्ण नाव मोहम्मद युसुफ खान असे होते. १९४४ मध्ये त्यांनी ज्वारभाटा हा पहिला चित्रपट केला तर १९९८ मधील किला हा चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट होता. मुगल ए आजम, देवदास, नया दौर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका वाखाणण्याजोग्या होत्या. आजही हे चित्रपट चाहत्यांकडून आवडीने पाहिले जातात. त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले होते. जगभरात त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.