नवी दिल्ली – रेसिंग कार मध्ये आपण अनेक बाईक हवेत उडताना बघतो. परंतु या बाईक काही क्षणभरच हवेत उडू शकतात. तसेच बॉलिवूडमधील काही सिनेमांमध्ये देखील दुचाकी हवेत उडताना दाखवलेल्या असतात. परंतु प्रत्यक्षात असे घडणे शक्य नसते, कारण विमानाप्रमाणे बाईक फार काळ हवेत उडू शकत नाही. मात्र, आता ही अशक्य वाटणारी गोष्ट जपानी तंत्रज्ञानाने शक्य झाली आहे. त्यामुळे बाईक हवेत व रस्त्यावरही उडू शकते. सध्या जपानमध्ये असलेली ही हवेत उडणारी बाईक लवकरच भारतात दाखल झाली तर आपल्याला देखील हवेत उडण्याचा आनंद घेता येऊ शकतो. मात्र त्यासाठी तुम्हाला तब्बल ५ कोटी रुपये तयार ठेवावे लागतील.
आतापर्यंत जगभरात फक्त फ्लाइंग कारचीच चर्चा होत होती, पण आता फ्लाइंग बाईकही आली आहे. एका जपानी स्टार्टअप कंपनीने आपली ही अत्याधुनिक पहिली फ्लाइंग बाईक (Hoverbike) सादर केली आहे. ही कंपनी A.L.I. टेक्नॉलॉजीज या कंपनीने फ्लाइंग बाईकची निर्मिती केली आहे. तिचे नाव Exturismo Limited Edition असे ठेवले आहे.
कंपनीचा दावा आहे की, ही उडणारी बाईक हवेत 40 मिनिटे उडू शकते, तिचा कमाल वेग 100 किलोमीटर प्रति तास आहे. यामध्ये पारंपरिक इंजिन आणि मोटरला उर्जा देण्यासाठी चार बॅटरी देण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बाईकची किंमत 77.7 मिलियन येन म्हणजे सुमारे 5.09 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.
या कंपनीने दि. 26 ऑक्टोबरपासून या बाईकचे बुकिंग सुरू केले आहे, सुरुवातीच्या टप्प्यात कंपनी तिचे फक्त 200 युनिट्स तयार करून विकणार आहे. सध्या काळ्या आणि लाल रंगाच्या या उडत्या बाईकची बॉडी ही आधुनिक मोटरसायकलशी मिळतीजुळती आहे. या बाईकचा वेग दाखवण्यासाठी कंपनीने नुकतेच टोकियो रेसट्रॅकवर या उपकरणाचे प्रात्यक्षिकही केले.
मित्सुबिशी इलेक्ट्रिक आणि क्योसेरा सारख्या कंपन्या या स्टार्टअप कंपनीला सपोर्ट करतात. त्याच्या चाचणी दरम्यान, ते जमिनीपासून काही मीटर वर हवेत उडवले गेले. परंतु सध्या, त्याच्या उड्डाणासाठी काही विशिष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत, विशेष म्हणजे ही बाईक जपानच्या सर्वात खदारीच्या रस्त्यावर वापरली जाऊ शकत नाही. कारण नादुरुस्त होऊन बाईक हवेतून जमिनीवर पडल्यास मोठा अपघात घडून शकतो.