दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आज शिवस्वराज्य यात्रेदरम्यान माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. आदिवासी समाजातील स्त्री एक उत्तम वक्ता आहे, त्यांचे भाषण ऐकून हे अनुभवले असे सागंत कौतुक केले.
यावेळी जयंत पाटील यांनी बोलतांना सांगितले की, अनेक प्रश्न आहेत. स्थानिकांना रोजगार नाही, पिण्याच्या पाण्याच्या योजना अपूर्ण राहिल्या आहेत, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, दूध उत्पादकता घटली आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, इतर कर्मचारी आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांची जाण असणारा उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी जलसंपदा मंत्री असताना येथील वळण बंदरांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली होती. आपले सरकार आल्यावर पाणी व्यवस्थापन आणि इतर सर्व प्रश्नांना सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.
एक सालस, संयमी, निष्ठावंत भगरे सरांना तुम्ही लोकसभेत निवडून दिले. आता विधानसभेसाठी देखील आपण असाच उमेदवार शोधून त्यास बहुमताने निवडून द्यायचे असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार डॅा. अमोल कोल्हे म्हणाले की, दिंडोरीकरांनी लोकसभेला एक हिरा निवडून दिलेला आहे, पण लक्षात ठेवा विधानसभा अजून बाकी आहे. महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही हे आता पुन्हा दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी असलेल्या भागांत गेल्या दोन वर्षांत विकासकामांसाठी एक पैशाचा निधी आलेला नाही. पण योजनांमधून हाच लोकांचा पैसा आज मते खरेदी करण्यासाठी वापरला जातोय.
हरियाणात आता निवडणुका चालू आहेत, मात्र लोकप्रतिनिधी यावेळी तिथल्या शेतकऱ्यांना तोंड कसं दाखवायचं या चिंतेत आहेत. कारण जेव्हा हे शेतकरी दिल्लीला आले होते तेव्हा त्यांचं स्वागत कसं केलं हे तुम्ही पाहिलं आहे. कांद्यावरची निर्यातबंदीही तुम्ही अशीच लक्षात ठेवा. मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, आपल्या आई-बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, या मागण्यांवर ठाम रहा. खुद्द गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वाढते गुन्हे पाहिले तरी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. हे लक्षात घेऊनच कदाचित देशभरातील निवडणुका सोडून केंद्रीय गृहमंत्री उद्या नाशिकला येत आहेत. जर केंद्रीय नेतृत्वाचा राज्यातील नेतृत्वावर विश्वास नसेल तर त्या लोकांवर आपण कसा विश्वास ठेवणार?
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीरामजी शेटे, हेमंत टकले, खा. भास्करजी भगरे, आमदार सुनील भुसारा, रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, सुनीलजी गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.